कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !

पुणे – उरुळीदेवाची येथील ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी ठेकेदाराने भरलेले ९९३ रुपये प्रतिटन हे शुल्क अधिक असून शुल्क अल्प केल्याविना प्रकल्प संमत केला जाणार नाही, अशी चेतावणी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. उरुळीदेवाची येथे ३०० टन ओला कचरा आणि २०० टन सुका कचरा यांसाठी संयुक्त निविदा काढली होती. या निविदा प्रक्रियेमध्ये केवळ २ आस्थापनांनी सहभाग नोंदवला; मात्र भूमीग्रीन एनर्जी एनव्हायरो प्रा.लि. या आस्थापनाने दुसर्‍या आस्थापनापेक्षा ९९३ रुपये, असे अल्प शुल्क लावले. प्रशासनाने पूर्वी या आस्थापनाला निविदा प्रक्रिया न राबवता ६९४ रुपये प्रतिटन शुल्काने काम देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र प्रत्यक्ष निविदा काढल्यानंतर या आस्थापनाने २३९ रुपयांनी शुल्क वाढवले. आयुक्त नवल किशोर राम यांनी ‘९९३ रुपये शुल्काने काम करून घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने शुल्क अल्प करावे’, अशी चेतावणी दिली.

संपादकीय भूमिका

वाढीव शुल्कामुळे कचरा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आहे का ? असे सर्वसामान्य नागरिकांना वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !