FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !

प्रभु श्रीराम आणि सीता यांचा अवमान

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनात ‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरा हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य करतांना

पुणे – प्रसिद्ध ‘स्टँड अप कॉमेडियन’ (एकल विनोदी कलाकार) कुणाल कामरा यांनी पुन्हा एकदा हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. त्याने देहलीतील जंतर-मंतर येथील १५ जुलै या दिवशी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला भेट दिली. त्या वेळी भाषण करतांना कामरा याने हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्या नावाचा अत्यंत अवमानास्पद आणि चिथावणीखोर राजकीय संदर्भ देत वापर केला. त्याची चित्रफीत ‘इंडिया स्क्रॉल्स’ या सामाजिक माध्यमावर प्रसारित केली आहे. या प्रकरणी पुण्यातील अधिवक्ता प्रदीप नाईक यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की,

१. या विधानामुळे समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२. कुणाल कामरा याला मुख्य आरोपी करण्यात आले असून घटनास्थळी उपस्थित असलेले ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.

३. या चित्रफितीची ‘डिजिटल फॉरेन्सिक पडताळणी’ करण्यात येऊन मूळ प्रत जप्त करावी.

कुणाल कामरा यांनी नेमके काय म्हटले होते ?

कामरा याने त्याच्या भाषणात, ‘ये सरकार सीता के पति का नाम ले-लेकर, नीता के पति का काम कर रहा हैं ।’, असे म्हटले होते. (सरकार सीतेच्या पतीचे (श्रीरामाचे) नाव घेत घेत नीताच्या पतीचे (उद्योगपती मुकेश अंबानी यांचे) काम करीत आहे, असे म्हटले आहे.


अमिता सचदेवा अधिवक्त्या, सर्वोच्च न्यायालय, देहली यांनी कुणाल कामरा याला पाठवलेली नोटीस –

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे कामरा याच्यासारखे विनोदी कलाकार कधी येशू ख्रिस्त किंवा अल्ला यांच्या विरोधात ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !