हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी वैचारिक पातळीवर लढा देणार्‍या मीनाक्षी शरण !

‘मीनाक्षी शरण या ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या संस्थापिका आहेत. ही संघटना भारतीय संगीत, नृत्य, कला आणि हस्तकला यांचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य करते. त्या भारतीय इतिहास आणि संस्कृती यांवर संशोधन करून त्याविषयी समाजात जागृती करतात. यासंदर्भात त्या विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, तसेच ‘फर्स्टपोस्ट’, ‘न्यूज १८’, ‘ई-संस्कृती’ इत्यादी संकेतस्थळे यांवर राष्ट्र आणि धर्म यांविषयी लिखाण करतात. त्यांचे ‘एशियन फ्युचर, सनातन विस्डम फॉर प्रिझर्विंग मदर अर्थ’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. यासह त्या ‘सरस्वती अनटोल्ड-हर जिओग्राफिकल एक्झिस्टन्स फ्रॉम द शास्त्राज’ या दुसर्‍या पुस्तकावर काम करत आहेत. ज्यावर त्यांनी ४५ मिनिटांची ओडिसी नृत्यनाटिका सिद्ध केली आहे. यासमवेतच त्या हिंदु धर्माविषयी पसरवण्यात येणारी खोटी कथानके (नॅरेटिव्हज्) खोडून काढण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. धर्मासाठी प्राणार्पण करणार्‍या कोट्यवधी हिंदूंसाठी ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या माध्यमातून सामूहिक तर्पणाचे आयोजन करण्यात येते. त्या गेली अनेक वर्षांपासून भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीत यांचे रक्षण अन् प्रचार यांचे कार्य करतात.

मीनाक्षी शरण

विशेष सदर


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. खलिस्तानी शक्तींशी सामना

मागील वर्षी मध्यप्रदेशमध्ये काही समाजद्रोही लोकांनी ‘शीख आणि हिंदु वेगळे आहेत’, असा अपप्रचार करून दोन समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र चालवले होते. त्याविरोधात मीनाक्षी शरण यांनी आवाज उठवला. त्यामुळे चिडलेल्या खलिस्तानी शक्तींनी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला; पण धर्म आणि ईश्वर यांवर अतूट श्रद्धा असल्याने त्यांनी त्याचा धैर्याने सामना केला.

अयोध्या फाऊंडेशन . . .

(चित्रावर क्लिक करा)

मीनाक्षी शरण यांच्याकडून १५ ऑगस्ट हा दिवस ‘श्राद्ध संकल्प दिवस’ साजरा करण्याविषयी करण्यात येणारे आवाहन !

भारताची एक उत्तरदायी नागरिक म्हणून वर्ष १९४७ मध्ये झालेल्या अखंड भारताची भयानक फाळणी आणि त्यासाठी उत्तरदायी घटकांविषयी माहिती देणे, हे मी माझे कर्तव्य मानते. बांगलादेशातील हिंदूंना त्या काळात हिंदूंनी सहन केलेल्या त्रासासारख्याच त्रासांना तोंड द्यावे लागत आहे. तेथील हिंदूंची लूटमार, बलात्कार, अमानुष मारहाण, हत्या आणि जाळपोळ हे विविध व्हिडिओंमध्ये आपण पाहू आणि अनुभवू शकतो. फाळणीपूर्वी आणि त्या कालावधीत भारतात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांमध्ये अन् आजच्या काळात उल्लेखनीय साम्य आहे. आपण इतिहास कधीही विसरू नये. अन्यथा त्याची पुनरावृत्ती होते. या दृष्टीकोनातून गेल्या १,४०० वर्षांपासून धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या कोट्यवधी हिंदूंसाठी तर्पण विधी करणे, हे आपल्या सर्वांचे धार्मिक कर्तव्य आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट हा दिवस ‘श्राद्ध संकल्प दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा ! यासह सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण सामूहिक तर्पण करूया. गंगा नदीचे पवित्र पाणी आणि अक्षता हातात घेऊन तर्पण विधी करूया.

२. धर्मरक्षणासाठी लढणार्‍या हिंदूंसाठी तर्पण विधी करण्याचे आवाहन

गेल्या २ सहस्र वर्षांत ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमकांविरुद्ध धार्मिक संघर्ष करतांना प्राण त्यागलेल्या लाखो हिंदूंसाठी सर्वपित्री अमावास्येला देशभरात सामूहिक तर्पण विधी करावा, असे आवाहन ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या वतीने करण्यात येते. यानिमित्त मीनाक्षी शरण या गेली ८ वर्षे हरिद्वारला जातात. वर्ष २०२४ मध्ये हरिद्वारच्या चंडी घाटावर त्यांनी अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत तर्पण विधी केला. हिंदु पूर्वजांमुळेच देशात आजही ८० टक्के हिंदू आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अयोध्या फाऊंडेशन’ सामूहिक तर्पणाचा उपक्रम देशभर राबवते. त्यापूर्वी १५ ऑगस्ट या दिवशी संकल्प केला जातो. ‘हिंदूंना त्यांच्या शूर आणि गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणे अन् त्यांना स्वरक्षणासाठी शत्रूपासून जागरूक करणे’, हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे.

Next #SamoohikTarpan – Sep 21, 2025

FORGOTTEN SACRIFICES OF 9 & 6 year olds | Ayodhya Foundation |

(सौजन्य : Ayodhya Foundation)

३. हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात जागृती

भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या’ होऊनही त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया येत नाही. येथे प्रतिवर्षी लाखो गोवंश कापला जातो; परंतु हिंदू त्यावर सामूहिकरित्या आवाज उठवत नाहीत. यामागे ‘हिंदूंना धर्मबोध आणि शत्रूबोध नाही, हे कारण आहे’, असे त्यांना वाटते. हे लक्षात घेऊन त्या हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात सातत्याने जागृती करत असतात.

४. ‘हर मंदिर दीपक’ चळवळ

‘अयोध्या फाऊंडेशन’च्या माध्यमातून दुर्लक्षित मंदिरांमध्ये देवतांचे पूजन करून दीप लावण्यात येतो. मंदिराच्या पूजेसाठी सामूहिक वर्गणी गोळा करून पुजार्‍याची नियुक्ती करण्यात येते, तसेच दिवाळीच्या वेळी ‘हर मंदिर दीपक’ चळवळ राबवण्यात येते. हिंदूंमध्ये स्वत:च्या संस्कृतीविषयी श्रद्धा वृद्धींगत व्हावी, यासाठी ही चळवळ चालू करण्यात आली आहे. या चळवळीचा प्रारंभ हिमाचल प्रदेशमधून करण्यात आला आहे.

मीनाक्षी शरण यांचे काही जाज्वल्य विचार !


१. हिंदूंचे अस्तित्व टिकवणे, हे धर्मयुद्ध आहे आणि त्यासाठी हिंदूंना धैर्य, विश्वास अन् शत्रूची पूर्ण ओळख झाली पाहिजे.

२. ट्वीट करणे, आंदोलन करणे, मेणबत्ती मोर्चा काढणे किंवा व्यथित कुटुंबासाठी निधी उभा करणे, यांमुळे काही होणार नाही. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात एकत्र लढा देणे आवश्यक आहे.

३. ‘लव्ह जिहाद’ थांबवण्यासाठी सर्व आंतरधर्मीय विवाह हे ‘विशेष विवाह कायद्या’खाली झाले पाहिजेत. यासमवेतच जडणघडणीच्या काळात हिंदु मुलींना सनातन धर्म आणि इतर धर्म यांतील भेद शिकवला पाहिजे.

४. इतिहास हा राष्ट्राचे भविष्य ठरवतो. इतिहासाची संपूर्ण माहिती असल्याविना आपण लढू शकणार नाही. त्यामुळे देशाची फाळणी झाल्यानंतर लाखो हिंदूंची हत्या करण्यात आली, हा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे.

५. हिंदु दुकानदारांकडूनच पूजा साहित्य घेण्याचे आवाहन

भारतात विविध प्राचीन मंदिरांच्या परिसरात धर्मांध पूजासाहित्याची दुकाने चालू करून त्या साहित्याची विक्री करत असतात. त्यांच्याकडून हिंदूंनी पूजा साहित्य खरेदी करू नये. यासाठी दुकानदाराने त्याच्या आधार कार्डाचा ‘ए-३’ आकारातील फलक दुकानात लावावा, असे आवाहन ‘अयोध्या फाऊंडेशन’ने केले आहे.

६. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये सहभाग

वर्ष २०१२ पासून गोवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून या अधिवेशनाला मीनाक्षी शरण उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठांना संबोधित करतात.

एकदा त्या म्हणाल्या,

‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे द्रष्टे आहेत. त्यांचे उद्दिष्ट भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणे आणि संपूर्ण जगाला हिंदु राष्ट्राकडे नेणे हे आहे, जे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कार्य करील.’’

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷