पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?

पाकव्याप्त काश्मीरमध्ये ७ जून २०२६ पासून तेथील स्थानिक जनतेचे पाकिस्तानी सत्तेविरोधात आंदोलन चालू आहे. विविध ठिकाणी विशेषकरून रावळकोट या शहरात एकत्र येऊन आंदोलन करणारा मोठा समुदाय हे त्याचे प्रतिनिधिक रूप असून त्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे आता जगभर झाली आहेत.

(भाग १)

१. आंदोलकांच्या मागण्या

आंदोलकांच्या ३८ कलमी मागण्या आहेत. त्यांचे सार हेच की, त्यांच्या भूप्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा त्यांना उचित वाटा मिळावा, अन्य पाकिस्तानींना जे स्वातंत्र्य आहे तेवढे तरी मिळावे, विकास व्हावा आणि मूलभूत गरजा पुरवाव्यात इत्यादी.

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

२. पाक सत्ताधिशांची भूमिका

पाकिस्तानातील सत्ताधिशांनी हे आंदोलन चिरडून काढायचा निश्चय केला आहे. एकही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बाहेरून अन्नधान्यही येऊ दिले जात नाही, अशी स्थिती तेथे आहे; जणू एक भूप्रदेश तुरुंग बनावा, असे काहीसे आहे.

३. आंदोलनाच्या पाठीराख्यांची भारताकडून अपेक्षा

आंदोलकांपैकी काहींनी, विदेशातून त्यांची पाठराखण करणार्‍या काहींनी ‘भारताने आता पाकव्याप्त काश्मीरकडे लक्ष वळवून त्यावर ताबा मिळवावा, या प्रदेशातील जनतेचे कल्याण करावे’, ही भूमिका या ना त्या प्रकारे मांडलेली आहे. उदाहरणार्थ डॉ. अमजद अयुब मिर्जा या विदेशात राहून जुलुमी पाकिस्तानी सत्ताधिशांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणार्‍या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही दिवसांपूर्वी यासंबंधाने ‘भारताने हस्तक्षेप करावा’, असे आवाहनही केले होते. काश्मीर खोर्‍यातही सीमेपलीकडील बांधवांविषयी सहानुभूती व्यक्त केली जात आहे. भारतातही ‘हा भूप्रदेश भारताने स्वतःच्या ताब्यात घ्यावा’, असे विचार मांडले जात आहेत.

४. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानपासून तुटणारच !

येथे पाकव्याप्त प्रदेशातील काश्मिरी आणि त्यांची मागणी यांविषयी काही सूत्रे बारकाईने लक्षात घ्यायला हवीत. या काश्मिरींना पाकिस्तानमध्ये पुष्कळच जाच होत आहे. या तुलनेत भारतात असलेल्या काश्मिरींना पुष्कळच सुख-सुविधा, विकास इत्यादींचा होत असलेला लाभ हा त्यांच्यासाठी स्वप्नवत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने आंदोलनातून अप्रसन्नता व्यक्त करण्याची आणि इस्लामाबादने त्याला काहीही करून दडपण्याची ही पहिली वेळ नाही. प्रत्येक दडपशाहीने येथील जनमानसाला घायाळ करून ठेवले आहे. या वेळची दडपशाही पहाता त्या जखमा भरण्याची शक्यता नाही. या सर्वांमुळे आज ना उद्या हा भाग पाकिस्तानपासून तुटणारच !

५. विलीनीकरणवाद्यांची इच्छा

‘ही प्रक्रिया जलद व्हावी. त्यातून पाकव्याप्त काश्मीर भारतात यावे, यासाठी भारताने सक्रीय भूमिका घ्यावी’, अशी अनेक भारतियांचीही इच्छा आहे. भारत सरकारने तेथील पाककृत मानवी हक्कभंगाविषयी कायमच टीका केली आहे. ‘बांगलादेश निर्मितीसाठी तेथील मंडळींना भारताने जसे सर्वतोपरी सहकार्य केले, तसे करावे’, असे वाटणाराही वर्ग आहे.

६. पाकव्याप्त काश्मीरवर ताबा, हा भारताचा न्याय्य हक्क !

मुळातच हा प्रदेश स्वातंत्र्यपूर्व जम्मू-काश्मीर संस्थानचा भाग होता. वर्ष १९४८ मध्ये तत्कालीन पाक लष्कराने कबालींच्या (पठाणांच्या) आडून घुसखोरी केली. या संस्थानचे अधिपती महाराजा हरिसिंह यांनी विलीनीकरणपत्रावर स्वाक्षरी करून कायद्याने हा भूप्रदेश भारतात विलीन केला. मग पाक घुसखोरीला विरोध करण्यासाठी भारतीय सैन्य काश्मीरमध्ये उतरले. सैन्याने घुसखोरी आटोक्यात आणली. अचानक तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम घोषित करत प्रश्न तत्कालीन संयुक्त राष्ट्र संघात नेला. मग सध्या पाकव्याप्त असलेला भूप्रदेश पाकिस्तानच्या अधिकारात आहे तसाच राहिला. काँग्रेस नेते नरसिंहराव पंतप्रधान असतांना भारतीय संसदेने ‘पाकव्याप्त काश्मीर हा भारताचेच अंग आहे’, असा एकमुखी ठराव करत यासंबंधी भारतीय जनतेची इच्छा स्पष्ट शब्दांत व्यक्त केली आहे.

७. ‘लेट अस फिनीश द जॉब’

वर्ष १९७१ मध्ये भारतीय सैन्याने कारवाई करत पूर्व पाकिस्तान नावाने ओळखला जाणारा, खरेतर मूळ अखंड भारताचाच भाग असलेला प्रदेश मुक्त करत ‘बांगलादेश’ या नव्या देशाची निर्मिती केली. या यशस्वी कारवाईत ९३ सहस्र पाक सैनिक बंदीवान बनवून भारतात आणले गेले. त्या वेळी भारतीय सैन्याचे सेनाधिपती सॅम माणेकशॉ यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विचारले होते, ‘तुम्ही अनुमती द्या. ‘लेट अस फिनीश द जॉब’!’ याचा अर्थ ‘आता पश्चिम सीमेवर कारवाई करत आधीच दुबळ्या बनलेल्या पाक सैन्याचे उरलेसुरले कंबरडे मोडून स्वतःचा भूभाग आपल्या ताब्यात घेऊया.’ पंतप्रधान इंदिरा गांधींनी याला अनुमती दिली नाही. थोडक्यात पाकव्याप्त काश्मीरचे विलीनीकरण भारतात व्हावे, ही प्रस्तुत लेखकासहित प्रत्येक भारतियाची इच्छा आहेच. असे असले, तरी काही वास्तवाचे भान येथे आपल्याला असायला हवे.

८. भारतियांनो, हे ऐतिहासिक सत्य विसरू नका !

काश्मीरचे महान हिंदु सम्राट ललितादित्य यांच्या काळात (इसवी सन ७२४ ते ७६०) सध्याच्या पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि आसपासच्या विशाल भूभागावर (म्हणजे अगदी ताश्कंदपर्यंत) कर्कोट घराण्याचे अधिकृत राज्य होते. या प्रदेशातील बहुतांश लोकसंख्या हिंदु आणि बौद्ध धर्मीय होती. स्वतः सम्राट ललितादित्य हे हिंदु धर्मीय होते; परंतु त्यांनी बौद्ध धर्मालाही राजाश्रय दिला होता. त्यांनीच प्रसिद्ध मार्तंड सूर्य मंदिर आणि शारदा पीठाची भव्य बांधकामे केली. काश्मीर खोर्‍यात आणि आजच्या पाकव्याप्त भागात इस्लामचा मोठ्या प्रमाणावर प्रसार १४ व्या शतकात मध्य आशियातून सूफींचे आगमन झाल्यावर झाला. त्यापूर्वी तिथे मुसलमान नव्हतेच.

लेखाच्या पुढील भागात पाकव्याप्त काश्मीरचे भारतात विलीनीकरण या सूत्राकडे पहाण्याविषयी तेथील स्थानिकांची आणि भारताची भूमिका यांतील नेमका भेद स्पष्ट होईल. त्या आधारे जेव्हा भारताला यासाठी प्रत्यक्ष काही करावे लागेल त्या वेळी कोणत्या सूत्रांचे भान असायलाच हवे, हेही स्पष्ट होईल.

   (क्रमशः)    

श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२६)