इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – जॉर्डनमध्ये इराणी क्षेपणास्त्राच्या आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी कार्यरत २ अमेरिकी सैनिक ठार झाले. यामुळे संतापलेल्या अमेरिकेने १९ जुलैच्या पहाटे इराणवर भीषण हवाई आक्रमण केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून हे आक्रमण करण्यात आले, अशी माहिती अमेरिकेच्या सैन्याने दिली. इराणच्या आक्रमणानंतर आणखी एक सैनिक बेपत्ता असून ४ जण घायाळ झाले होते. त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

अमेरिकेच्या सैन्याने सांगितले की, हॉर्मुझ सामुद्रधुनीतून (दोन जलाशयांना जोडणार्‍या जलमार्गातून) जाणार्‍या व्यावसायिक नौकांना धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता न्यून करणे, तसेच जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या सैनिकांवर आक्रमण करणार्‍या इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या सैन्याला तातडीने शिक्षा करणे, हे आमच्या आक्रमणांमागील मुख्य उद्देश आहेत.

संघर्ष आणखी तीव्र होईल ! – इराण

अमेरिकेच्या सैन्याने इराणमधील सिरीक या दक्षिण किनारपट्टीच्या शहराजवळील भाग आणि हाजी आबादजवळील भाग यांना लक्ष्य केल्याची माहिती इराणने दिली. अमेरिकेच्या आक्रमणानंतर संघर्ष आणखी तीव्र होईल आणि अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी इराणने दिली आहे.
गेल्या आठवड्यात युद्धबंदी संपुष्टात आल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमणे चालू ठेवल्याने त्यांच्याकडून हे वक्तव्य आले आहे, ज्यामुळे मोठ्या प्रादेशिक संघर्षाची चिंता वाढली आहे.