उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !

ठाणे – उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक ३ येथे म्हशीच्या गोठ्यांवर अन्न आणि औषध प्रशासन आणि मध्यवर्ती पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत शासनाने बंदी घातलेल्या ‘ऑक्सिटोसिन’ इंजेक्शनच्या ६१२ प्लास्टिकच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूलजवळील गोठ्यात म्हशींना हे इंजेक्शन बेकायदेशीरपणे दिले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही धाड टाकण्यात आली.

या वेळी गोठा चालवणारे प्रकाश वाधवानी यांच्याकडून हा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अन्य गोठ्यांमध्येही या इंजेक्शनचा वापर होत असल्याने त्या दृष्टीने प्रशासनाने अन्वेषण करावे, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बंदी घातलेल्या औषधांचा वापर करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई चालूच राहील, अशी चेतावणी अन्न आणि औषध प्रशासनाने दिली आहे.

काय आहेत ऑक्सिटोसिन इंजेक्शनचे दुष्परिणाम ?

ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिल्यानंतर म्हशींकडून नैसर्गिक प्रक्रियेपेक्षा बळजोरीने दूध उतरवले जाते, त्यामुळे जनावरांवर ताण येतो. वारंवार वापरामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन प्रजनन क्षमता, गर्भाशय आणि स्तनग्रंथी यांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच अशा दुधाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. (लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाई झाल्यासच हे प्रकार थांबतील ! – संपादक)