प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !

रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमधील अस्वच्छतेविषयी ग्राहक पंचायतीचे निवेदन

रेल्वे प्रशासनाला निवेदन देतांना ग्राहक पंचायतीचे सदस्य

पाचल – रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीतील स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेविषयी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने कोकण रेल्वेच्या विभागीय पर्यवेक्षकांना निवेदन देण्यात आले. या वेळी ग्राहक पंचायत रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा सचिव आशीष भालेकर, महिला सचिव श्रेया साळवी, तसेच दिलीप कांबळे आणि उमेश नितोरे उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. रत्नागिरी-दिवा आणि परतीच्या ‘पॅसेंजर’ गाड्यांमधील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेविषयी ग्राहक पंचायतीकडे अनेक प्रवाशांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. या तक्रारींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी स्वतः संबंधित गाडीने प्रवास करून प्रत्यक्ष पहाणी केली. त्या वेळी गाडीतील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याचा, तसेच त्यांची वेळेवर आणि नियमानुसार स्वच्छता होत नसल्याचा अनुभव वारंवार आला. त्यामुळे प्रवाशांकडून करण्यात आलेल्या तक्रारी वस्तूस्थितीला धरून असल्याचे निदर्शनास आले.

२. या परिस्थितीमुळे प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत असून विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसह प्रवास करणार्‍या प्रवाशांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतागृहांची अस्वच्छता ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर गोष्ट आहे.

३. या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी ‘पॅसेंजर’ गाडीतील स्वच्छतागृहांची नियमानुसार आणि नियमित स्वच्छता करण्यात यावी, आवश्यक देखभाल करावी, तसेच प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना द्याव्यात.

या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

संपादकीय भूमिका

रेल्वेगाडीत स्वच्छतागृहे स्वच्छ असावी, तसेच अन्य सुविधांविषयी प्रवाशांना निवेदन का द्यावे लागते ? खरेतर प्रवाशांच्या मूलभूत हक्काची जाणीव रेल्वे प्रशासनाने ठेवून स्वतःहून या सुविधा देणे अपेक्षित आहे !