स्वतःचे कुटुंब टिकेल ?

अभिनेते आमिर खानने किती लग्न केली, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात त्याची असुया इतरांनी बाळगावी, असे काहीच नाही. आहे ते लग्न मोडून पुन्हा संसार थाटण्यात काहीच अर्थ नसतो, हे बहुतांश मध्यमवर्गीय पुरुष जाणतात; पण मग हे मिडियावाले, वृत्तपत्रे आमिर खानचे लग्न ‘बेगाने की शादी मे दिवाना’ झालेल्या अब्दुल्लापेक्षाही वेडे होत का बरे दाखवतात ? त्यातही त्याच्या आधीच्या २ बायका आणि मुले अत्यंत खूश होती, आनंदी होती, असे का दाखवले अन् भासवले जाते ? हा केवळ ‘टी.आर्.पी.’ (टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट – दूरचित्रवाहिनीवरील मालिका किती लोकप्रिय झाली, हे कळण्यासाठीचे साधन)चा खेळ नाही. समाजमन एका विशिष्ट दिशेने वळवण्याचा एक पद्धतशीर आणि योजनाबद्ध खेळ आहे. स्वतःचे कुटुंब त्यापासून किती काळ वाचेल, हाच खरा प्रश्न आहे.

१. कुटुंबव्यवस्था अन् पुरुषसत्ताक संस्कृती वाईट, हे पुरोगाम्यांनी वारंवार ठसवणे

सिनेमा, मालिका आणि नाट्य क्षेत्रांतील कलावंत; शिक्षण क्षेत्रातील ‘मार्क्स’वंत, उच्चभ्रू (एलीट) वर्ग, उच्चशिक्षित, नवश्रीमंत आणि शहरी भागांतील उच्च मध्यमवर्गीय यांच्या कुटुंबांत व्यसनांना प्रतिष्ठा, स्वैर वर्तन अन् बहुपत्नीत्व आता स्थिरावले आहे. लग्न करणे, घटस्फोट घेणे आणि पुन्हा लग्न करणे, हे त्यांच्यात सामान्य आहे. ‘सिंगल पॅरेंटिंग’(केवळ आईनेच किंवा वडिलांनीच मुलांना वाढवणे), पुन्हा लग्न झाल्याने बाप किंवा आई पालटणे सामान्य आहे. ‘लिव्ह इन रिलेशन’ (ग्राम्य भाषेत ठेवलेली बाई किंवा ठेवलेला बाप्या – लग्न न करता एकत्र रहाणे) हेसुद्धा अगदी ‘पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें’ इतके सामान्य झाले आहे. सिनेमा, मालिका, लेख, चर्चा यांतून अशा गोष्टी करणे, म्हणजे कसे पुरोगामी असणे, हे वारंवार ठसवले जाते. लग्न, कुटुंब, संसार या गोष्टी किती तकलादू आहेत, अत्याचार करणार्‍या, समतेच्या आणि समानतेच्या विरुद्ध कशा आहेत, ‘ब्रॅह्मेनिकल पॅट्रिआर्की’ (थोडक्यात ‘पुरुषसत्ताक संस्कृती’) कशी वाईट आहे, हेच बिंबवले जाते. अगदी मराठी वाहिन्यांवरही ‘माझ्या नवर्‍याची बायको’पासून अगदी ‘माझ्या बायकोचा नवरा’ इथपर्यंत मालिकांचा प्रवास होतो. या सगळ्यांचे पुढील पिढीवर आणि समाजावर होणारे परिणाम पाश्चिमात्य देश भोगत आहेत.

२. विदेशात जाणवलेला ‘सिंगल पॅरेंटिंग’चा दुष्परिणाम आणि आता स्थिर कुटुंबाचा केला जाणारा विचार

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

पाश्चात्त्य देशांमध्ये गेल्या काही दशकांत कुटुंबसंस्थेत झालेले पालट आणि मुलांचे मानसिक आरोग्य यांवर पुष्कळ अभ्यास झाला आहे. ‘द लॅन्सेट’सारख्या जागतिक आरोग्य नियतकालिकांमधील संशोधनानुसार जन्मदात्या आईवडिलांसह लहानाचे मोठे झालेल्या मुलांपेक्षा ‘सिंगल पॅरेंटिंग’ किंवा वारंवार पालक पालटणार्‍या कुटुंबांतील मुलांमध्ये ‘डिप्रेशन’चा (निराशेचा) धोका २ ते ३ पट अधिक असतो. अशा मुलांमध्ये आत्महत्येचे विचार येणे किंवा तसा प्रयत्न करण्याचे प्रमाण दुप्पट आहे. सावत्र आई / वडील येणे किंवा तेही सोडून जाणे यांमुळे मुलांचे जन्मदात्या आईवडिलांशी असलेले भावनिक बंध तुटतात. त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होतो. अशी मुले गुन्हेगारीकडे वळण्याचे आणि व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे अनेक अहवालांत म्हटले आहे.

पाश्चात्त्य देशांमध्ये या समस्येवर आता मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे. ‘केवळ वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आर्थिक प्रगती माणसाला मानसिक स्थैर्य देऊ शकत नाही. त्यासाठी स्थिर कौटुंबिक वातावरण आवश्यक असते’, हा विचार तिथे होत आहे.

३. भारतात पाश्चात्त्यांचे होत असलेले अंधानुकरण 

आपल्याकडे मात्र चित्र अगदी उलटे आहे. लहान वयात शोभून दिसणारे कपडे तरुण वयात घालून मुली सार्वजनिक ठिकाणी फिरतात. त्या आधीच्या पिढीत ‘काहीही होत नाही गं, तू घाल तुला हवे ते कपडे’, असे म्हणत त्यात काही चुकीचे नाही, हे ठसवले गेले. अंतर्वस्त्रे बाहेर दिसणे, त्वचेला घट्ट चिकटून तंग होणारे कपडे सार्वजनिक ठिकाणी घालणे या पिढीत सामान्य आहे. ते ‘सामान्य’ होणे, यालाच ‘नॉर्मलायझेशन’ म्हणतात. कुंकू किंवा टिकली लावून जाणार्‍या मुलीला तिच्यासमवेतच्या मुली ‘काकूबाई’ म्हणून चिडवतात. तीही ते लावणे बंद करते. ‘संस्कारी’ असण्याची थट्टा उडवली जाते. आपल्याकडे जे जे चांगले आणि उदात्त होते; त्याची सिनेमा, नाटक, कथा, कादंबरी, ‘रील्स’ (छोट्या ध्वनिचित्रफीती) या माध्यमांतून पद्धतशीरपणे थट्टा उडवली गेली. अजूनही उडवली जाते. संस्कृतीचा अभिमान अजिबात न बाळगणारी आपली चौथी पिढी आहे. सतीसारख्या अपवादांना ‘प्रथा’ ठरवून नकारात्मक भावना पाठ्यपुस्तकांतून जोपासली गेली. या वाळवीने हिंदु संस्कृतीला इतके ग्रासले आहे की, जे चांगले आहे, त्याला चांगले म्हणायचे आपले धाडसच होत नाही. तसे म्हटले वा वागले,  तर आपण ‘कूल’ (चांगले) दिसत नाही, ‘पॉलिटिकली करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या योग्य) होत नाही.

४. साम्यवाद्यांकडून समाज, कुटुंब आणि संस्कृती मोडीत काढण्याचे वैचारिक प्रयत्न अन् त्यासाठी भारत प्रयोगशाळा !

या वाळवीचा प्रारंभ पुष्कळ आधी झाला आहे. कार्ल मार्क्सची एकही भविष्यवाणी खरी न होण्याचे कारण मार्क्सवादात न शोधता त्याचे खापर समाज आणि संस्कृती यांवर फोडले गेले. ‘क्रिटिकल थिअरी’ने कधीच मार्क्सवादाचा क्रिटिकल अभ्यास केला नाही. एरिख फ्रॉम आणि अडॉर्नो यांनी ‘द ऑथॉरिटेरियन पर्सनॅलिटी’सारखे शास्त्रीय अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की, पारंपरिक कुटुंब, रिलिजन अन् संस्कृती मानणारा सामान्य मध्यमवर्गीय माणूस हा मानसिकदृष्ट्या ‘हुकूमशाही’ आणि ‘फॅसिस्ट’ प्रवृत्तीचा असतो. त्यांनी स्वतःच्या साम्यवादी विचारसरणीच्या अपयशाचे प्रामाणिक चिंतन कधीच केले नाही. उलट समाजाने त्यांच्या सिद्धांतानुसार वागावे म्हणून त्यांनी समाज, कुटुंब, परंपरा आणि संस्कृती या सर्व संस्थांनाच मोडित काढण्याचे वैचारिक प्रयत्न चालू केले. हा प्रवास वर्ष १९१७ पासून चालू झाला. ‘पारंपरिक कुटुंब आता कालबाह्य झाले आहे’, असे लिहिणारी अलेक्झांड्रा कोलोन्टाई, त्यानंतर वर्ष १९७१ मध्ये ‘द डेथ ऑफ द फॅमिली’ या पुस्तकातून डेव्हिड कूपरपासून सोफी लुईसपर्यंत हा प्रवास चालूच आहे. सोफी लुईसने तर आपल्या ‘ऍबोलिश द फॅमिली : अ मॅनिफेस्टो फॉर केअर अँड लिबरेशन’ या पुस्तकात ‘कुटुंबव्यवस्था ही हिंसाचार, लिंगभेद आणि विषमता यांचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे मानवाच्या खर्‍या मुक्तीसाठी ती संपुष्टात आणणे आवश्यक आहे’, असे थेट लिहिले आहे. या ‘लिबरल’ (उदारमतवादी) विचारांच्या प्रभावाने पाश्चिमात्य देशातील कुटुंबे आणि त्यांची संस्कृती संपत चालली आहे. भारतीय संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था संपवण्यासाठी व्यक्तीस्वातंत्र्याचा, समता-समानतेचा अन् एकांगी कायद्यांचा यथेच्छ वापर भारतात केला जात आहे.

‘वोकिझम’सारख्या (जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती म्हणजे वोकिझम !) गोष्टी हिंदु संस्कृतीत हळूहळू रुजवल्या जात आहेत. भारत ही त्यासाठी प्रयोगशाळा आहे. समाजमन एका विशिष्ट दिशेने पद्धतशीर अन् योजनाबद्ध रितीने वळवले जात आहे. स्वतःचे कुटुंब त्यापासून किती काळ वाचेल, हेही आता सांगता येत नाही. (१५.७.२०२६)

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.

(साभार : ‘प्रसन्नवदने’ ब्लॉग)