‘अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिले. त्याचा आनंदोत्सव देशभर साजरा झाला; पण त्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागला. अनेकांनी तन, मन, धन आणि प्राण यांचे योगदान दिले. त्यात श्रीराममंदिराची न्यायालयीन लढाई जिंकून देण्यात प्रखर धर्माभिमानी पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांचे योगदान मोठे आहे. पू. अधिवक्ता हरि शंकर जैन हे सर्वाेच्च न्यायालयात वकिली करतात. त्यांची हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याविषयी वचनबद्धता पाहिली, तर आपल्याला भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्म ते संगोस्तवकर्मणि ।’, म्हणजे ‘तुम्हाला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे; पण त्याच्या फळावर नाही. कर्माच्या फळांना तुमचे ध्येय बनवू नका आणि अकर्मात कोणतीही आसक्ती ठेवू नका’, या शिकवणीची आठवण होते. श्रीराममंदिरानंतर ते उत्तरप्रदेशातील काशी, मथुरा, मध्यप्रदेशमधील भोजशाळा आदी मंदिरांच्या मुक्तीसाठीही विनामूल्य न्यायालयीन लढाई लढत आहेत. ‘हा देश संपूर्ण ‘हिंदु राष्ट्र’ व्हावा, हे त्यांचे एकमेव स्वप्न आहे आणि हे स्वप्न सत्यात उतरावे’, यासाठी त्यांना सतत ध्यास लागला आहे. त्यांनी आयुष्यात तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे देशभरात त्यांची ‘कर्मठ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता’ म्हणून ओळख बनली आहे. ते ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष आहेत. त्यांचे सर्वसाधारणपणे भारतीय समाज आणि विशेषतः भारतीय संस्कृती यांच्यासाठी अतुलनीय योगदान आहे. त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन हेही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून यशस्वी मार्गक्रमण करत आहेत.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. लहानपणापासून हिंदुत्वासाठी कार्य करण्याचा ध्यास
पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांचा जन्म २७ मे १९५४ या दिवशी झाला. त्यांनी वर्ष १९७६ मध्ये वकिली चालू केली. ‘मोगलांच्या काळात ज्या हिंदु मंदिरांशी छेडछाड झाली, (मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या), ती सर्व मंदिरे परत घ्यायची आहेत आणि पुढे जाऊन हिंदु राष्ट्राची संकल्पना साकार करायची आहे’, अशी शिकवण पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांना त्यांच्या आईने वयाच्या १० व्या वर्षीच दिली होती. त्यामुळे कदाचित् लहानपणापासूनच त्यांना ‘आपल्याला हिंदुत्वाचेच कार्य करायचे आहे’, असा ध्यास लागला होता.
२. श्रीराममंदिराच्या लढ्यात सक्रीयपणे सहभाग

वर्ष १९८६ मध्ये रामजन्मभूमीचे टाळे उघडल्यानंतर देशात हिंदुत्वाची एक लाट आली. तेव्हा त्यांना जाणीव झाली, ‘त्यांना आईने दिलेली शिकवण वास्तवात आणण्याची वेळ आली आहे आणि आपल्याला काहीतरी केले पाहिजे.’ तेव्हापासून त्यांनी या कार्यात सक्रीय होण्यासाठी प्रयत्न चालू केले. ‘१० जुलै १९८९ या दिवशी रामजन्मभूमीच्या संदर्भातील सर्व खटले आता उच्च न्यायालयात चालतील’, असा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठाने आदेश दिला. त्यानंतर हिंदु महासभेने याप्रकरणी त्यांना अधिवक्ता म्हणून नेमले. तेव्हापासून ते हिंदु महासभेच्या माध्यमातून रामजन्मभूमीच्या लढ्यात सक्रीयपणे सहभागी झाले. त्या वेळी ते त्यांच्या यशस्वी कारकिर्दीच्या मध्यभागी होते. त्यांनी हा खटला हिंदु महासभेच्या बाजूने २ दशकांहून अधिक काळ लढला.
हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणणार्या अधिवक्ता राजीव धवन यांना सडेतोड प्रत्युत्तर !

सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीच्या प्रकरणाची सुनावणी चालू असतांना विरोधी पक्षाचे अधिवक्ता राजीव धवन यांनी ‘हिंदू तालिबानी आहेत’, असे वक्तव्य केले होते. तेव्हा पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी भर न्यायालयात ‘हिंदू तालिबानी असतील, तर मीही तालिबानी आहे. मला जी शिक्षा द्यायची असेल, ती द्या’, असे निक्षून सांगितले होते.
३. रामजन्मभूमी प्रकरणात मुसलमानांची बाजू मांडण्याचा प्रस्ताव नाकारणे
पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांना रामजन्मभूमी प्रकरणात मुसलमानांची बाजू मांडण्याचा प्रस्ताव मिळाला होता. त्यासाठी त्यांना भरमसाठ शुल्कही मिळाले असते; परंतु हा प्रस्ताव त्यांनी नाकारला. ‘पैशांसाठी आपला आत्मा विकू शकत नाही’, असा त्यामागे त्यांचा दृष्टीकोन होता. अधिवक्त्यांच्या चमूचा भाग म्हणून त्यांनी रामजन्मभूमीचा खटला ३२ वर्षे लढला.

४. रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी वैयक्तिक आशा-आकांक्षांना तिलांजली
६ डिसेंबर १९९२ या दिवशी तथाकथित बाबरीचा ढाचा पाडण्यात आला. त्याच दिवशी त्यांची आई स्वर्गवासी झाली. तरीही ते धर्माप्रती असलेल्या त्यांच्या दायित्वातून मागे हटले नाहीत. त्यांनी त्यांच्या आईच्या १३ व्याच्या दुसर्याच दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठात याचिका प्रविष्ट केली. न्यायालयाने भगवान श्रीरामांची पूजा करण्याची अनुमती देईपर्यंत ते या प्रकरणात ठाम राहिले. ते कडाक्याच्या थंडीत सर्व कागदपत्रांसह रिक्शात एकटे बसून लक्ष्मणपुरी उच्च न्यायालयात जायचे; कारण त्या काळात विशेष सुविधा नव्हत्या. त्या काळात उच्च न्यायालयांमध्येही विशेष सुरक्षा उपाय नव्हते. ते नेहमीच मुसलमान समुदायाच्या लोकांनी वेढलेले असायचे. रामजन्मभूमीविषयी विशेष सुनावणी चालायची, तेव्हा संपूर्ण न्यायालय धर्मांधांनी भरलेले असायचे. त्याही स्थितीत पू. अधिवक्ता जैन हे हिंदूंच्या बाजूने एकटेच आवेशात प्रतिवाद करायचे. या वेळी त्यांनी ‘भगवान रामाचे दर्शन घेणे, हा प्रत्येक हिंदूचा जन्मसिद्ध हक्क आहे. भगवान राम हे एक संवैधानिक अस्तित्व आहेत आणि त्यांचे दर्शन थांबवता येत नाही; म्हणूनच ते तात्काळ उघडले पाहिजे’, असा युक्तीवाद केला. ही सुनावणी सलग १० दिवस चालली.
‘अपमान ते सन्मान’ असा खडतर प्रवास !
आज काळ पालटला आहे. आज पू. अधिवक्ता हरि शंकर जैन हे नाव राष्ट्रीय स्तरावर आदराने घेतले जाते. पूर्वी हिंदुत्वासाठी कार्य करत असल्यामुळे समाज आणि नातेवाईक यांचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन अतिशय नकारात्मक होता. अनेक जण त्यांना कार्यक्रमामध्ये बोलावण्याचेही टाळत होते. ‘यांना बोलावले, तर आपल्यावर जातीयवादी किंवा हिंदुत्वनिष्ठ यांचा ठपका बसेल’, अशी भीती त्यांना होती. ‘त्यांच्याशी संपर्क आल्यास आपली हानी होऊ नये’, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे नातेवाईक आणि परिचित त्यांच्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करत होते. त्याला त्यांचे न्यायालयीन क्षेत्रही अपवाद नव्हते. अधिवक्ते आणि न्यायाधीश त्यांना टोमणे मारायचे. धर्मासाठी लोकांकडून त्यांनी तिरस्कार सहन केला; पण पू. अधिवक्ता जैन यांनी त्यांचा लढा सोडला नाही. यात त्यांना त्यांच्या सहचारिणीचेही सहकार्य लाभले.
१ जानेवारी १९९३ या दिवशी न्यायमूर्ती हरिनाथ तिलारी यांनी ऐतिहासिक निवाडा दिला, ‘श्रीरामाचे दर्शन त्वरित चालू करण्यात यावे. प्रभु श्रीराम घटनात्मक पुरुष आहेत आणि त्यांचे दर्शन थांबवता येऊ शकत नाही.’ या निवाड्यानंतर पू. अधिवक्ता जैन यांच्या जिवाला धोका असल्याचे न्यायमूर्तींना जाणवले. त्यानंतर त्यांनी पू. जैन यांना स्वत:च्या गाडीत हबीबगंज चौकातील हनुमान मंदिरापर्यंत पोचवले. तेथून ते घरी गेले. ‘असा कोणताही खटला किंवा निवाडा नसता, तर वर्ष २०१० आणि २०१९ मध्ये आपल्याला रामजन्मभूमीविषयी आलेले निकालपत्र दिसले नसते, तसेच आज अयोध्येत उभे राहिलेले प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिरही दिसले असते का ?’, ही शंकाच आहे.
५. धर्मरक्षणासाठी उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांच्याशी संघर्ष
अ. वर्ष १९८९ ते १९९४ या काळात उत्तरप्रदेशमध्ये मुलायम सिंह यांच्या समाजवादी पक्षाचा सत्ताकाळ होता. त्यामुळे पू. जैन यांचा त्यांच्याशी नेहमी संघर्ष झाला. त्यांच्या सरकारने अयोध्या येथे शेकडो कारसेवकांवर गोळ्या चालवल्या होत्या. तेव्हा सरकारने १६ कारसेवक मारले गेल्याचे म्हटले होते; पण पू. जैन यांनी घटनास्थळी जाऊन १६ नाही, तर ३६५ कारसेवक मारले गेल्याचा दावा केला होता.
आ. वर्ष १९८९ ते १९९४ या काळात पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी मुलायम सिंह सरकारच्या विरोधात अनेक खटले प्रविष्ट केले होते. त्यामुळे त्यांचा पू. जैन यांच्यावर रोष होता. एक दिवस रात्री मुलायम सिंह यांचे मुख्य सचिव ए.पी. सिंह यांनी पू. जैन यांना मुख्यमंत्र्यांचा विरोध सोडून देण्याची चेतावणी दिली. तसे न केल्यास परिणामांना सामोरे जाण्यास सांगितले. तेव्हा ‘ही वस्तू विकाऊ नाही’, असे सांगून त्यांनी मुख्य सचिवांना परत पाठवले.
इ. मुलायम सिंह यांनी असे सुरक्षादल बनवले होते, ज्यात हिंदु-मुसलमान यांचे ५०-५० टक्के प्रमाण रहाणार होते. पू. अधिवक्ता जैन यांनी ते थांबवले. त्यानंतर त्यांनी उर्दू भाषांतरकार आणि उर्दू शिक्षक यांची भरतीही थांबवली.
ई. वर्ष १९८६ मध्ये न्यायमूर्ती के.एम्. पांडे यांनी श्रीराममंदिर उघडण्याचा ऐतिहासिक आदेश दिला होता. त्या वेळी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदावर बढती होणार होती; पण त्यांनी श्रीराममंदिराच्या बाजूने निवाडा दिल्याने मुलायम सिंह संतापलेले होते. त्यामुळे त्यांनी न्यायमूर्ती पांडे यांच्या बढतीमध्ये खोडा घातला. त्याला पू. जैन यांनी विरोध केला आणि मुलायम सिंह यांचे षड्यंत्र उघड केले. त्यामुळे न्यायमूर्ती पांडे यांना बढती मिळाली.
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात अधिवक्ता हरि शंकर जैन यांना घोषित करण्यात आले संत !
एकाच कुटुंबात एकाच वेळी पिता संत झाल्याचे, तसेच त्यांचे पुत्र आणि नातू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची दुर्मिळ घटना !

धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, निष्काम भावाने सेवारत रहाण्याची वृत्ती, उत्साहाचा अक्षय स्रोत आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ रामराज्याचा, म्हणजे हिंदु राष्ट्राचा ध्यास आदी विविध गुणांचा समुच्चय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता हरि शंकर जैन यांचा श्रीरामाप्रती उत्कट भाव आहे. अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर भव्य राममंदिर बांधले जावे, यासाठी तन, मन, धन आणि प्राणही समर्पित करण्याची सिद्धता ठेवत न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांना वर्ष २०१९ च्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात संत झाल्याची आनंदवार्ता हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दिली. धर्मरक्षणाच्या कार्यासह आध्यात्मिक वाटचालीतही पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि त्यांचा नातू चि. वृषांक या दोघांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे याच अधिवेशनात घोषित करण्यात आले.
| हे ही वाचा → राममंदिर उभारण्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन संतपदी विराजमान ! |
६. तत्कालीन मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या विरोधातील खटला
तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी १९ धर्मांध आतंकवाद्यांची सुटका केली होती. त्यामुळे पू. अिधवक्ता जैन यांनी अखिलेश यादव यांच्या विरोधात खटला प्रविष्ट केला होता. त्यानंतर अखिलेश यादव यांनी त्यांना शिक्षण मंडळाच्या ‘स्टँडिंग कौन्सिल’वरून काढून टाकले.
७. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या विरोधात उमेदवारी
पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी वर्ष १९९३ मध्ये अमेठीतून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली; पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली, ‘सोनिया गांधी भारतीय नसून इटालियन वंशाच्या नागरिक आहेत.’ या आधारावर त्यांनी त्यांच्या निवडीला आव्हान दिले होते. यासमवेतच त्यांनी सोनिया यांच्या स्व. राजीव गांधी यांच्या समवेतच्या लग्नाच्या वैधतेलाही आव्हान दिले होते. त्यांनी ‘नागरिकत्व कायदा, १९५५’च्या कलम ५(१)(क) च्या वैधतेलाही आव्हान दिले, ज्या अंतर्गत सोनिया गांधी यांनी नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवले होते.
हिंदु धर्माशी संबंधित १०२ खटल्यांमध्ये सहभाग !
पू. अधिवक्ता हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे हिंदु धर्माशी संबंधित अनुमाने १०२ हून अधिक खटल्यांमध्ये सहभागी आहेत.

१. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या पीडितांसाठी विनामूल्य न्यायालयीन लढाई
केवळ श्रीराममंदिरच नाही, तर एखादी मुलगी ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकली, तर तिच्यासाठी विनामूल्य खटला लढणे, कुठे पिंपळाचे झाड कापले आहे, कुठेतरी लहानशी हनुमानाची मूर्ती तोडली आहे, अशा प्रकरणांसाठीही सातत्याने लक्ष्मणपुरीच्या न्यायालयात त्यांनी न्यायालयीन लढे दिले आहेत.
२. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरासाठी लढा

‘मथुरा येथील शाही ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थळ असलेल्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. त्यामुळे ही मशीद काढून १३.३७ एकर भूमी देवतेला हस्तांतरित करण्यात यावी’, अशी मागणी पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी न्यायालयाकडे केली आहे. याचा खटला सध्या चालू आहे.
३. ताजमहालला शिवमंदिर घोषित करण्याची मागणी

ताजमहाल हे मुळात शिवमंदिर असल्याचा दावा पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २०१५ मध्ये स्थानिक ६ अधिवक्त्यांनी ‘ताजमहलला शिवमंदिर घोषित करावे’, अशी मागणी येथील दिवाणी न्यायालयात केली आहे.
४. टिलेवाली मशीद खटला
‘टिलेवाली मशीद परिसर वास्तविक शेषनागस्थ टिलेश्वर महादेवाचे स्थान आहे. त्यामुळे ते हिंदूंना सोपवण्यात यावे’, यासाठी पू. अधिवक्ता हरि शंकर जैन न्यायालयीन लढाई लढत आहेत.
५. कुतूबमिनार बांधण्यासाठी मुसलमान आक्रमकांनी पाडलेल्या २७ हिंदु आणि जैन मंदिरांचे प्रकरण

कुतूबमिनारचा परिसर हा मुळात मंदिरांचा होता. २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून अन् त्यांच्या अवषेशांमधून मशीद बांधण्यात आली. या परिसरात पूजा करण्याची अनुमती मिळण्यासाठी पू. अधिवक्ता जैन यांनी न्यायालयात याचिका केल्या. याप्रकरणी सुनावणी चालू आहे.
६. काशीविश्वनाथ धाम आणि ज्ञानवापीचे प्रकरण

अयोध्या श्रीरामजन्मभूमी प्रकरणात मोठा विजय मिळवल्यानंतर पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी काशीविश्वनाथ धामशी संबंधित ज्ञानवापीच्या प्रकरणात मोठा विजय मिळवला. भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालाच्या आधारे पू. जैन यांनी असा दावा केला आहे की, ज्ञानवापीमध्ये मशीद नाही, तर मंदिर आहे. हिंदूंचा मूलभूत अधिकार म्हणून पू. अधिवक्ता जैन यांनी देवी शृंगारगौरीची पूजा आणि प्रार्थना करण्याची अनुमती मागितली होती. त्यावरून पुढे तेथे केलेल्या उत्खननात अनेक हिंदु प्रतीके आणि शिवलिंग आढळले आहे. सध्या हा खटला वाराणसी न्यायालयामध्ये चालू आहे.
७. भोजशाळा प्रकरण

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा प्रकरणी पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी इंदूर उच्च न्यायालयात ‘रिट’ याचिका प्रविष्ट केली आहे. वर्ष १०३४ मध्ये राजा भोज याने तेथे भव्य गुरुकुल (भोजशाळा) बांधले होते. मुसलमान आक्रमकांनी ते पाडून तेथे मशीद बांधली आहे. तेथे सरस्वतीदेवीचे मंदिर असल्याचा हिंदूंचा दावा आहे. या संपूर्ण परिसराचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
८. राज्यघटनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत घुसडलेल्या ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ (सेक्युलर) या शब्दांच्या दुरुस्तीच्या वैधतेला पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याविषयीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू आहे.
९. पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी सच्चर आयोगाच्या अहवालाच्या वैधतेलाच न्यायालयात आव्हान दिले आहे.
८. दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये प्रभावी सहभाग
पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांचा विविध दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये सहभाग असतो. त्यात ते हिंदु धर्म, आक्रमकांनी पाडलेली मंदिरे, हिंदु राष्ट्र आणि हिंदु जनता यांच्या बाजूने प्रभावीपणे प्रतिवाद करतांना दिसतात.
९. कृतज्ञता
पू. अधिवक्ता हरि शंकर जैन हे वयाच्या ७० व्या वर्षीही तरुणांना लाजवेल, अशा पद्धतीने हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी, तसेच आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी उभारलेल्या जागा पुन्हा हिंदूंना मिळाव्यात, यासाठी जो लढा संयत आविष्काराने देत आहेत, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !