Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा

नसरापूर हत्या प्रकरण

आरोपी भीमराव कांबळे

पुणे – भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या खटल्यात २५ जूनला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले. न्यायालयात दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला असून सरकारी अधिवक्त्यांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी असल्याचे मान्य केले. या प्रकरणीचा अंतिम निकाल २९ जूनला सुनावला जाणार आहे. राज्याच्या इतिहासत अवघ्या पावणेदोन महिन्यांत निकाल लागणारा हा सर्वांत वेगवान खटला ठरला आहे.

सरकारी अधिवक्त्यांनी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचतांना सांगितले, ‘‘भीमराव कांबळेला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप नाही. त्यामुळे तो दयेच्या पात्रतेचा नाही. ज्या साडेतीन वर्षांच्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला, तिच्यावर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. तिच्या अंगावर १८ जखमा केल्याचे वैद्यकीय पडताळणीतून समोर आले. अशा नराधमाला जर कठोर शिक्षा झाली नाही, तर समाजात भीतीचे वातावरण निर्माण होईल आणि सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल. त्यामुळे त्याला केवळ आणि केवळ मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी.’’