काणकोण येथील श्री पर्तगाळी मठ येथे ‘जीवोत्तम विद्यापीठम्’ या नवीन वैदिक विद्यालयाचा शुभारंभ

काणकोण, २४ जून (वार्ता.) – ‘‘जीवोत्तम विद्यापीठम्’ हे विद्यापीठ श्रीमद् मध्व सिद्धांतावर आधारित वैदिक शिक्षणाचे केंद्र म्हणून कार्य करील आणि सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे उद्गार काणकोण येथील श्री पर्तगाळी मठाचे मठाधीश श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी काढले. दक्षिण अयोध्या म्हणून ओळखल्या जाणार्या श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ येथे २४ जून या दिवशी निज ज्येष्ठ शुक्ल दशमीच्या शुभमुहूर्तावर ‘जीवोत्तम विद्यापीठम्’ या नवीन वैदिक शिक्षण केंद्राला प्रारंभ झाला आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी मार्गदर्शन करत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘या विद्यापिठात ५ वर्षांच्या अभ्यासक्रमात संस्कृत, वेद, कर्मांग आणि ज्योतिष यांचा समावेश असेल, तर १० वर्षांच्या अभ्यासक्रमात संस्कृत, वेद, कर्मांग, ज्योतिष, न्याय, व्याकरण आणि वेदांत यांचे सखोल शिक्षण दिले जाणार आहे. हे विद्यापीठ म्हणजे केवळ शैक्षणिक संस्था नसून वैदिक परंपरा, मध्व तत्त्वज्ञान आणि गुरु-परंपरेचा अमूल्य वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोचवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.’’ ‘जीवोत्तम विद्यापीठम्’मध्ये संस्कृत विभागासाठी श्री गणेश भट (गोकर्ण) आणि श्री राघोत्तम आचार्य (बेंगळुरू) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेद विभागासाठी श्री अथर्व भांडेकर, तर ज्योतिष आणि कर्मांग विभागाचे प्रमुख अन् प्राचार्य म्हणून इडगुंजी, होन्नावर येथील श्री लक्ष्मीकांत भट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेचे उद्दिष्ट श्रीमद् मध्व सिद्धांताचा प्रचार करणारे आणि सारस्वत समाजाच्या सेवेसाठी कार्य करणारे विद्वान घडवणे हे आहे. कार्यक्रमात श्रीहरि, गुरु आणि देवी सरस्वती यांच्या पूजनानंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके अन् शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. याचबरोबर ‘जीवोत्तम विद्यापीठम्’च्या शैक्षणिक कार्याचा औपचारिक शुभारंभ झाला. या कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कार विजेते मोहनदास पै, आर्.एस्. शानभाग (बेंगळुरू), मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, उपाध्यक्ष रामचंद्र आर्. कामत, पर्तगाळी चातुर्मास्य समितीचे अध्यक्ष अनिल पै, अन्य पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !