‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

  • विधानपरिषद कामकाज तारांकित प्रश्न

  • आवश्यक साहित्य केंद्र शासनाला सादर !

(एन्.सी.ई.आर्.टी. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) इयत्ता ८ वीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ वगळण्यात आले होते. हा जाज्वल्य इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी राज्यशासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना मंत्री भुसे म्हणाले की, ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांविषयीचे संदर्भ वगळल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या पुस्तकांतूनही हा नकाशा वगळण्यात आला होता. या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सातारा येथे या विरोधात धडक मोर्चाही काढण्यात आला होता.

राज्यशासनाने ९ मार्चला नवी देहली येथील ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला पत्र पाठवून याविषयी विनंती केली आहे. पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास समाविष्ट करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य शासनाने ‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडे पाठवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म, बालपण, स्वराज्य स्थापना, महाराजांची युद्धनीती (गनिमी कावा), किल्ले, प्रशासन, राज्याभिषेक आणि महाराजांनंतरचा मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास या सर्व सूत्रांचा पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा, यासाठी शासन आग्रही आहे.

या संदर्भातील सर्व कार्यवाही ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या देहली कार्यालयाच्या वतीने होत असल्याने राज्यशासन केंद्र सरकारशी याविषयी सतत संपर्क ठेवून आहे, असेही मंत्री भुसे यांनी शेवटी स्पष्ट केले.

हिंदु जनजागृती समितीकडून मंत्र्यांची भेट आणि निवेदन !

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देतांना (डावीकडून) श्री. रवींद्र नलावडे आणि श्री. सुनील घनवट

याच विषयाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची २५ जून या दिवशी भेट घेतली. समितीने ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या ‘हमारे अतीत’ या इयत्ता ८ वीच्या या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा, या मागणीसाठी मंत्र्यांना सविस्तर निवेदन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. रवींद्र नलावडे उपस्थित होते.

या वेळी समितीच्या प्रतिनिधींशी बोलतांना मंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘या विषयासाठी आम्ही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली असून त्यांना याविषयीचे अधिकृत पत्रही दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनीही या विषयात स्वतः लक्ष घातले असून केंद्र स्तरावर आमचे प्रयत्न आणि पाठपुरावा सातत्याने चालू आहे.’’