हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सावंतवाडी – येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात पैशांची मागणी करणार्‍या मुसलमानांसारख्या वेशातील ३ संशयित काश्मिरी नागरिकांना पोलिसांनी कह्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हे नागरिक जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यातील मणीगा गावचे असल्याचे निष्पन्न झाले. असे असले, तरी हे नागरिक काश्मीरमधून एवढ्या लांब सावंतवाडीत का आले ? ते कुणाच्या आश्रयाने थांबले होते ? त्यांच्याकडे असलेली ओळखपत्रे आणि कागदपत्रे खरी कि बनावट ? त्यांना येथे नेमके कुणी आणले आणि त्यामागील उद्देश काय ? असे अनेक गंभीर प्रश्‍न हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत.

भटवाडी काजरकोंड परिसरातील एका घरात पुरुष आणि एक युवती अशा ३ व्यक्तींनी प्रवेश केला आणि पैशांची मागणी केली; मात्र त्यांच्या वागण्याबोलण्याचा संशय आल्याने घरच्यांनी तातडीने स्थानिक हिंदुत्वनिष्ठ  संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला. पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता ते तिघेही स्थानिक नसल्याचे आणि त्यांची हिंदी भाषाही वेगळी असल्याचे निदर्शनास आले. संशय वाढल्यामुळे पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

पोलिसांनी येऊन ३ जणांना कह्यात घेतले अन् पोलीस ठाण्यात नेले. प्राथमिक चौकशीत हे नागरिक जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यातील मणीगा गावचे असल्याचे निष्पन्न झाले. सावंतवाडी पोलिसांनी थेट जम्मू-काश्मीरमधील संबंधित पोलीस ठाणे, तेथील बीट अंमलदार आणि सरपंच यांच्याशी भ्रमणभाषवरून संपर्क साधून माहिती घेतली. त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर, हे नागरिक फिरस्ते असल्याची नोंद करून त्यांना परत पाठवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले, तसेच नागरिकांनी अशा संशयित लोकांपासून सावध रहावे आणि संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.