कर्नाटकच्या प्रस्तावित कळसा-भंडुरा प्रकल्पाला कर्नाटकातील खानापूर येथील शेतकर्‍यांचा विरोध

बेळगाव – म्हादई नदी ही गोव्याची जीवनदायिनी आहे आणि कर्नाटक सरकार म्हादई नदीचे पाणी कळसा-भंडुरा प्रकल्पाच्या माध्यमातून कर्नाटकतील मलप्रभा नदीत वळवू पहात आहे. कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाला खानापूर येथील लोकप्रतिनिधी, शेतकरी, पर्यावरणप्रेमी, धार्मिक नेते आदींनी विरोध दर्शवला आहे. ९ एप्रिल या दिवशी यासंबंधी एक निवेदन स्थानिक तहसीलदारांना देण्यात आले, तसेच स्थानिक पंचायतीने प्रस्तावित प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव घेण्याची मागणी केली आहे. खानापूर येथे झालेल्या बैठकीला गोव्यातील पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांचीही उपस्थिती होती.

प्रस्तावित प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी संबंधितांनी ९ एप्रिल या दिवशी प्रारंभी खानापूर येथे एक बैठक घेतली. या बैठकीत प्रस्तावित प्रकल्पामुळे खानापूर परिसर आणि पश्चिम घाट येथे होणार्‍या पर्यावरणाच्या हानीविषयी माहिती देण्यात आली. कर्नाटक सरकारने प्रस्तावित कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी खानापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना भूसंपादनासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. या प्रकरणी कायदेशीर लढा देण्यासाठी संबंधित शेतकर्‍यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. म्हादईच्या संरक्षणासाठी गोमंतकियांनीही या लढ्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.