Ram Navami Procession Banned In Pakur : पाकूड (झारखंड) येथे प्रशासनाने अनुमती नाकारल्याने श्रीरामनवमीची मिरवणूक काढता आली नाही !

अनुमती नाकारल्याचा पाकूड जिल्हा प्रशासनाचा आदेश (उजवीकडे)

पाकुड (झारखंड) – येथे प्रशासनाने हिंदूंना श्रीरामनवमीची मिरवणूक काढण्यास अनुमती नाकारल्याने ६ एप्रिल या दिवशी मिरवणूक काढता आली नाही. प्रशासनाचे म्हणणे होते की, मिरवणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे देण्यात आली नाही, तसेच मिरवणुकीत सहभागी होणार्‍या लोकांची संख्याही सांगण्यात आली नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मिरवणुकीला अनुमती देण्यात आली नाही. ‘जर आदेशाचे उल्लंघन झाले, तर मिरवणूक काढणार्‍यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाईल’, अशी चेतावणीही प्रशासनाने दिली होती.

श्रीरामनवमी आयोजन समितीने ६ एप्रिल २०२५ या दिवशी पाकूडमध्ये मिरवणूक काढण्याची अनुमती मागितली होती. समितीने म्हटले होते की, कोलाजोडा, समसेरा, प्रहारकोल, गोकुळपूर, नागरनवी, झिकहरती, पिरलीपूर, बहिरग्राम आणि चेंगडंगा या गावांतील लोक मिरवणुकीत सहभागी होतील. त्यांच्याकडे पारंपरिक शस्त्रे, धार्मिक ध्वज आणि ध्वनी प्रणालीदेखील असेल. समितीने प्रशासनाला सुरक्षा पुरवून सहकार्य करण्याची विनंती केली होती. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी पाकूड शहर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांकडून अहवाल मागवला होता; परंतु त्यांनी वेळेवर अहवाल सादर केला नाही. त्यामुळे प्रशासनाने अनुमती नाकारली.

भविष्यात दिवाळी आणि दुर्गापूजा यांवरही बंदी घालण्यात येईल ! – भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी या प्रकरणात प्रशासन आणि सरकार यांच्या वृत्तीवर टीका केली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, पाकूड जिल्हा प्रशासनाचा हा आदेश हिंदूंच्या श्रद्धेवर थेट आक्रमण आहे. जेव्हा पाकुरमध्ये ताजिया (इमाम हुसैन यांच्या समाधीची प्रतिकृती. ती अनेक प्रकारात आणि आकारात बनवली जाते.)  मिरवणूक काढता येते, तर श्रीरामनवमीची मिरवणूक का काढू नये ? आज श्रीरामनवमीवर बंदी घालणारे सरकारने उद्या दिवाळी आणि दुर्गापूजा यांवरही बंदी घालू शकते. हिंदुविरोधी शक्तींच्या दबावापुढे झुकणारे प्रशासन लोकशाहीसाठी धोकादायक आहे. झारखंडमध्ये हे वारंवार घडत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली हिंदूंचे सण थांबवले जात आहेत, तर दुसर्‍या समुदायाला सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. असे दिसते की, कट्टरतावाद्यांच्या दबावाखाली सरकार पाकूडला अघोषित ‘ग्रेटर (बृहद) बांगलादेश’ बनवण्याची सिद्धता करत आहे.

संपादकीय भूमिका

झारखंडमध्ये तेथील हिंदूंनी ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ पक्षाला सत्तेवर बसवल्याचा परिणाम हिंदूंनाच भोगावा लागत आहे, हे हिंदूंच्या लक्षात येईल तो सुदिन !