सिंधुदुर्ग जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात श्रीरामनवमी उत्सव साजरा

पानवळ, बांदा येथील श्रीराम पंचायत मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करतांना डावीकडून सद्गुरु सत्यवान कदम, पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, प.पू. दास महाराज आणि पू. सुमन नाईक

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात ६ एप्रिलला सर्वत्र श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भजन, कीर्तन, प्रवचन, श्रीराम नामसंकीर्तन यांमुळे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले होते.

सावंतवाडी तालुक्यातील पानवळ, बांदा येथील श्रीराम पंचायतन मंदिरात प.पू. दास महाराज, पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि फोंडा, गोवा येथील पू. सुमन नाईक या संतांच्या वंदनीय उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नित्यपूजा, अभिषेक, भजने, आंदुर्ले (कुडाळ) येथील ह.भ.प. सदाशिव पाटील यांचे श्रीरामजन्मावरील कीर्तन झाल्यानंतर दुपारी १२ वाजता श्रीरामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. उपस्थित संतांनी श्रीरामाच्या पाळण्याला झोका देऊन या उत्सवात सहभाग घेतला. त्यानंतर उपस्थित संतांचा सन्मान आणि कीर्तनकार ह.भ.प. पाटील अन् त्यांचे साथीदार यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर रामरक्षास्तोत्र पठण आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा सामूहिक जप, पर्वरी (गोवा) येथील भजन मंडळाने प.पू. भक्तराज महाराज यांनी रचलेली प्रासादिक भजने सादर केली. रात्री स्थानिक ग्रामस्थांची भजने झाली. यानिमित्त शकडो भाविकांनी श्रीरामाचे दर्शन आणि महाप्रसाद यांचा लाभ घेतला.

सावंतवाडी शहरात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने रामजन्मोत्सव साजरा झाल्यानंतर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी गीतरामायण आणि दशावतारी नाट्यप्रयोग, असे कार्यक्रम झाले. कुडाळ शहरात श्री कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ तालुक्यात वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर, मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, कसाल येथील श्री पावणाई मंदिर, देवगड तालुक्यात जामसंडे, भटवाडी येथील शिवकालीन श्रीराम मंदिर, कणकवली शहरातील काशीविश्वेश्वर मंदिर; मारुतिवाडी, फोंडाघाट येथील श्री विठ्ठल मंदिर, मालवण तालुक्यातील आचरा येथील संस्थानकालीन श्री रामेश्वर मंदिर, दोडामार्ग तालुक्यातील मुळस-हेवाळे येथील श्रीराम मंदिर यांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.