सनातनमधील दैवी बालकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात मनमोकळेपणाने केलेला संवाद आणि त्यातून लक्षात आलेली त्यांची दैवी गुणवैशिष्ट्ये !

एकदा सनातनमधील काही दैवी बालकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी बालसाधकांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांशी मनमोकळेपणाने केलेला संवाद आणि गुरुदेवांनी केलेले त्यांचे कौतुक’ यांविषयीची काही सूत्रे आपण १२ मार्चला पाहिली. आज त्यापुढील सूत्रे येथे देत आहोत. 

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/891784.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

३. दैवी बालकांचा भाव

३ अ. साधनेसाठी रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञताभावात असलेली कु. सायली देशपांडे (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १५ वर्षे) ! 

कु. सायली देशपांडे

कु. सायली : गुरुदेव, मला रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. आपली एवढी कृपा आहे की, ती कोणत्या शब्दांत व्यक्त करावी, हेच मला समजत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : कशासाठी कृतज्ञता ?

कु. सायली : माझ्या वडिलांचे (रवींद्र देशपांडे यांचे) निधन झाल्यानंतर आम्ही विचार केला, ‘आता काय करायचे ?’ येथे घरी राहून (यवतमाळ, महाराष्ट्र येथे राहून) साधना होऊ शकत नाही. येथे रामनाथी आश्रमात आपण आम्हाला साधनेसाठी एवढ्या सोयीसुविधा दिल्या आहेत. आमची साधना व्हावी आणि आमच्या जन्माचे सार्थक व्हावे, यांसाठी आपण काय काय केले आहे गुरुदेव ! मी पुष्कळ कृतज्ञ आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे सर्व धैवतमुळे झाले हं ! (श्री. धैवत वाघमारे हे कु. सायलीचे मामा आहेत.) धैवत येथे नसता, तर तुम्ही येथे आलाच नसता.

कु. सायली : आपली पुष्कळ कृपा आहे गुरुदेव !

३ आ. सनातन संस्था निर्मित सात्त्विक उत्पादने आणि गुरुदेव यांच्याप्रती कु. प्रार्थना पाठक (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) हिचा कृतज्ञताभाव ! 

कु. प्रार्थना : परम पूज्य, आपल्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटते; कारण आपण आम्हाला दैनिक ‘सनातन प्रभात’ दिले आहे, तसेच सनातनची सात्त्विक उत्पादने अत्तर, कापूर आणि अष्टगंध हेही दिले आहे. त्यामुळे आमच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात आणि पुष्कळ चैतन्यही मिळते. आपण आम्हाला आनंद देण्यासाठी किती वेळ देता. मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

३ इ. वडिलांच्या निधनाचे दुःख झाल्यावर ‘गुरुदेवच माझे पिता आहेत’, असा भाव ठेवणारा कु. श्रीनिवास देशपांडे (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय १३ वर्षे) ! 

कु. श्रीनिवास देशपांडे

कु. श्रीनिवास : माझ्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा ‘आता मला बाबा नाहीत’, असे वाटून मला पुष्कळ दुःख झाले होते. नंतर मी ‘आपणच माझे पिता आहात’, असा विचार केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले : सुंदर !

३ ई. रामनाथी आश्रमात आल्यानंतर ‘गुरुदेव समवेतच आहेत’, असे वाटणे 

कु. श्रीनिवास : मी रामनाथी आश्रमात आलो. तेव्हा मी असा इकडे-तिकडे फिरत होतो. तेव्हा मला माझ्या मागे आपण दिसलात. जसे एखाद्या लहान मुलाचे आई-वडील त्याच्या मागे मागे फिरतात ना तसे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : सुंदर !

४. दैवी बालकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

४ अ. बालसाधकांद्वारे कु. अपाला हिचे केलेले परीक्षण 

परात्पर गुरु डॉ. आठवले (कु. अपाला हिला) : तू पूर्वीपेक्षा आनंदी आहेस ना ? इकडे बाजूला येऊन उभी रहा ! (बालसाधकांना उद्देशून) हिचा चेहरा तुम्ही पूर्वीही पाहिला आहे आणि आताही पहात आहात. काही फरक आहे का ?

एक दैवी बालिका : अपाला पुष्कळ आनंदी दिसते आणि ‘तिच्या डोळ्यांमध्ये भाव आहे’, असे वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले (अपाला हिला) : भाव आहे ना मनात ? बरोबर सांगितले ना तिने ?

कु. अपाला : भाव अजून वाढवायचा आहे. आणखी पुष्कळ वाढवायचा आहे.

कु. प्रार्थना : मला असे वाटले, ‘अपालाकडून सगळीकडे पुष्कळ भाव आणि चैतन्य प्रक्षेपित होत आहे अन् अपाला पुष्कळ आनंदीही दिसत आहे.’

कु. वेदश्री भुकन (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ११ वर्षे) : मलाही तिचा चेहरा आनंदी दिसत आहे आणि तिच्या डोळ्यांमध्ये भाव आहे.

कु. श्रिया राजंदेकर (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १३ वर्षे) : तिच्या डोळ्यांमध्ये आनंद दिसत आहे. तिचे डोळे निळे झाले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : डोळे निळे झाले आहेत ?

कु. श्रिया राजंदेकर : हो

परात्पर गुरु डॉ. आठवले : छान ! तू कधी आरशात पाहिला आहेस का स्वतःचा चेहरा ? बघा मुलांना किती समजते आहे.

कु. श्रीनिवास : मला असे वाटते, ‘तिच्या चेहर्‍यावर पुष्कळ आनंद आहे आणि पुष्कळ चैतन्यही आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुलाही (साधनेत) लवकर लवकर पुढे जायचे आहे. हळू हळू नाही हं !

कु. सायली : अपालाच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर ‘आनंद प्रक्षेपित होत आहे’, असे वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : यातून मोठ्या साधकांनाही शिकायला मिळेल ना, भाव कसा असला पाहिजे ?

कु. पूजा काळुंगे : परम पूज्य, मी पूर्वी अपालाला पाहिले आहे. आता अपाला पहिल्यापेक्षा पुष्कळ आनंदी दिसते आणि तिच्या चेहर्‍यावरील तेज अन् चैतन्य यांचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे. ‘तिला पाहिल्यावर ती सतत भावावस्थेत असते आणि परम पूज्य आपल्या अनुसंधानात असते’, असे वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुलाही एवढे समजते ? आहेस ना हुषार ? एक दिवस या सत्संगात आलीस आणि हे सर्व लक्षात येऊ लागले !

कु. पूजा काळुंगे : ते आपणच सुचवले !

कु. अपाला : परम पूज्य, एक प्रार्थना करायची होती. साधकांनी हे सर्व सांगितले; पण मला माझ्यामधील अहं आणि स्वभावदोष यांवर अधिक प्रयत्न करायचे आहेत गुरुदेव ! त्यामुळेच आपल्याला अपेक्षित अशी अपाला तयार होईल. यासाठी ‘मला शक्ती मिळू दे आणि आपला संकल्प होऊ दे, तसेच मला प्रत्येक क्षणी शरणागतभावात रहाता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना करत आहे.  (क्रमश:)

वास्तूची सूक्ष्म-स्पंदने सांगणारे सनातनचे बालसंत पू. वामन राजंदेकर !

पू. वामन राजंदेकर

कु. श्रिया : आम्ही पुण्याला गेलो होतो, तेव्हा आमच्या मावशीकडे राहिलो होतो. तेव्हा पू. वामन यांनी तिचे संपूर्ण घर फिरून पाहिले आणि म्हटले, ‘‘येथे नारायण नाही.’’ (पू. वामन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘नारायण’ असे म्हणतात.)

परात्पर गुरु डॉ. आठवले : कसे आहेत ना आपले बालसंत !

कु. श्रिया : हो आणि त्यांनी म्हटले, ‘‘येथे सगळे काळे काळे आहे. येथे सर्व बंद आहे.’’ नंतर आम्ही आमच्या आजीच्या (वडिलांच्या आईच्या) घरी गेलो. तेथे सगळे जण साधना करतात. सत्संग ऐकतात आणि सर्व जण प्रयत्नही करतात. तेथे पू. वामन म्हणाले, ‘‘येथे नारायण आहे आणि बंद बंद नाही अन् काळेही नाही.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले : तीन वर्षांच्या (वर्ष २०२४ चे वय ६ वर्षे) मुलाला एवढे समजते की, कोणत्या घरात काय आहे !

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक