भाऊसाहेब बांदोडकर यांनीच रोवला आधुनिक गोव्याचा पाया !

भाऊसाहेब बांदोडकर जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे उद्गार !

पणजी, १२ मार्च (वार्ता.) – गोवा मुक्तीनंतर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनीच प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सेवा यांवर भर देऊन आधुनिक गोव्याचा पाया रोवला. आज आमचे सरकारही गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊनच काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भाऊसाहेब बांदोडकर जयंतीच्या निमित्ताने पणजी येथील जुन्या सचिवालयानजिक आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मगोचे नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि इतर मान्यवर यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गीते, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई आणि अन्य मान्यवर यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘भाऊसाहेब बांदोडकर यांचे योगदान आणि ज्ञान भावी पिढीला राज्याच्या विकासासाठी समर्पित होण्यासाठी प्रेरणा देत राहील. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मिरामार येथील समाधीचे सरकार नूतनीकरण करत असल्याने यंदा तेथे हा जयंतीचा कार्यक्रम झाला नाही; मात्र पुढील वर्षापर्यंत नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जयंतीचा कार्यक्रम तेथे होणार आहे.’’