
पणजी, १२ मार्च (वार्ता.) – ‘रमझान असो किंवा रामनवमी’ ‘लाला की बस्ती’ पाडण्याच्या आदेशाची कार्यवाही होणार आहे. कोमुनिदाद (गावकर्यांची पोर्तुगीजकालीन संस्था) प्रशासक आवश्यक त्या यंत्रणांच्या साहाय्याने ‘लाला की बस्ती’ पाडण्याची कार्यवाही करेल’, अशी स्पष्टोक्ती थिवी मतदारसंघाचे आमदार तथा मासेमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली. ‘लाला की बस्ती’ ही थिवी मतदारसंघात येते.
लाला की बस्ती’ पाडण्याचा आदेश वर्ष २०१० मध्ये देण्यात आला होता. या आदेशाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वाेच्च न्यायालयानेही आव्हान याचिका फेटाळल्याने आता कारवाईचा मार्ग मोकळा झालेला आहे. थिवी कोमुनिदादनेच ‘लाला की बस्ती’ पाडण्यासाठी प्रथम न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. आता आदेशाची कार्यवाही कोमुनिदाद प्रशासकाला करावी लागणार आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर पुढे म्हणाले, ‘‘पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते आणि इतर संबंधित यंत्रणा यांना कळवून आदेशाची कार्यवाही केली जाणार आहे.’’ थिवी कोमुनिदादच्या भूमीत ३४३/१४ आणि ३४३/१२ या सर्व्हेमधील अनधिकृत बांधकामे ११ मार्चनंतर केव्हाही पाडण्यात येतील, अशी नोटीस ‘लाला की बस्ती’तील २५ घरांना गत मासातच देण्यात आली आहे.