एकदा सनातनमधील काही दैवी बालकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी बालसाधकांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांशी मनमोकळेपणाने केलेला संवाद आणि गुरुदेवांनी केलेले त्यांचे कौतुक’ यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

१. ‘गुरुदेवांना अपेक्षित असे व्यष्टी साधनेचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी प्रार्थना करणारी कु. अपाला औंधकर (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) !

कु. अपाला : गुरुदेव, ‘आपण आम्हाला व्यष्टी साधना कशी करायची ?’, हे शिकवले आहे. भ्रमणभाषची ‘बॅटरी’ न्यून झाली की, आपण भ्रमणभाष भारित (चार्जिंग) करण्यासाठी लावतो, तसेच आम्ही (परात्पर गुरुदेवांच्या साधक-जिवांनी) चांगल्या प्रकारे व्यष्टी साधना केली नाही, तर आमचीही ‘बॅटरी’ न्यून होऊ लागते. ‘ती भारित कशी करायची’, हे आपण आम्हाला शिकवले आहे. ‘क्षमायाचना करणे, स्वतःच्या चुका फलकावर लिहिणे, ईश्वराला आत्मनिवेदन करणे, तसेच प्रायश्चित्त घेणे’, असे प्रयत्न केल्याने साधक-जिवाची ‘बॅटरी’ भारित होऊ लागते. परात्पर गुरुदेवांनी साधकांना ‘दिव्य प्रभारक (चार्जर)’, म्हणजे व्यष्टी साधनारूपी प्रभारक दिला आहे. ‘माझी व्यष्टी साधना आपल्याला अपेक्षित अशी होऊ दे’, ही आपल्या चरणी प्रार्थना करते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : खूप छान.
२. दैवी बालकांची गुणवैशिष्ट्ये
२ अ. प्रत्येक साधकामध्ये गुरुरूप पाहून त्याच्याकडून शिकणारी कु. अपाला औंधकर !
कु. अपाला : पूर्वी आपण सांगत होतात, ‘या साधकाकडून शिका, त्या साधकाकडून शिका.’ तेव्हा ते माझ्या मनापर्यंत पोचत नव्हते. नक्की ‘काय शिकायचे आहे ?’, हे माझ्या बुद्धीपर्यंतच जात होते. त्यामुळे ‘मनापासून कसे प्रयत्न करायचे’, ते माझ्या लक्षात येत नव्हते. त्यानंतर आपण मला शिकवले की, ‘एखाद्या साधकाकडे केवळ साधक म्हणून पाहिल्यास आपण त्याच्याकडून शिकू शकत नाही; पण त्या साधकामध्ये गुरुदेवांना पाहिले, तरच त्याच्याकडून शिकू शकतो.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : खूप छान !
२ आ. प्रत्येक कृतीकडे साधनेच्या दृष्टीने पहाणार्या कु. प्रार्थना पाठककडून (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) शिकणारी कु. अपाला !
कु. अपाला : मला कु. प्रार्थना पाठक हिच्याकडून शिकायला मिळाले. तिने एक उदाहरण दिले, ‘राजस्थानमध्ये पाणी आणायला जाणार्या स्त्रिया पाण्याचा घडा डोक्यावर ठेवतात आणि त्यावर आणखी ४ – ५ घडे ठेवून त्या चालत जातात. चालतांना त्या एकमेकींशी गप्पा मारत असतात; पण बोलतांना त्यांचे सर्व लक्ष डोक्यावर ठेवलेल्या घड्यांकडेच असते. त्याचप्रमाणे इतर सर्व कृती करतांना आपलेही लक्ष नेहमी ईश्वराकडेच असले पाहिजे.’ प्रार्थना वयाने माझ्यापेक्षा लहान आहे, तरी मला तिच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. त्यामुळे ‘मी तिच्या समवेतच रहायला पाहिजे’, असे मला वाटते.
२ इ. साधनेच्या तळमळीमुळे दिवाळीतही सत्संगासाठी मुंबईहून गोव्याला येणारी कु. मोक्षदा कोनेकर (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १३ वर्षे) !

कु. मोक्षदा : मी मुंबईला जाऊन आले ना, तर माझा मायेत अडकण्याचा भाग झाला.
परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे काय झाले ?
कु. मोक्षदा : माझी बहीण पुष्कळ आग्रहाने मला म्हणत होती, ‘‘मोक्षदा, तू येथेच रहा. दिवाळी झाल्यानंतर गोव्याला जा.’’ तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘रामनाथी आश्रमात सत्संग असतात आणि आम्हाला साधना करायची असते.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘एक दिवस साधना केली नाही, तर काही फरक पडतो का ?’’ तेव्हा मी म्हटले, ‘‘फरक पडतोच. मला जावेच लागेल.’’ मी तिचे काही ऐकले नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : एवढ्या लहान वयात दिवाळीसाठीसुद्धा मुंबईत रहायचे नव्हते ? मग आई-बाबांनी ‘हो’ म्हटले का ?
कु. मोक्षदा : मी आईला विचारले, ‘नातेवाईक असे असे म्हणत होते, तर मी काय करू ?’ तेव्हा आई मला म्हणाली, ‘‘तू तुझ्या साधनेकडे लक्ष दे. ’’
परात्पर गुरु डॉ. आठवले : अच्छा !
२ ई. ‘सातत्याने कृती करण्यासाठी काय करायला पाहिजे’, यावर दोन दैवी बालिकांनी दिलेले सुंदर उत्तर !
कु. मोक्षदा : परम पूज्य, कधी कधी माझ्या सर्व कृतींमध्ये सातत्य रहात नाही, तर मी काय करायला हवे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : आधी तूच उत्तर सांग आणि नंतर ‘तुझ्याकडून काय होऊ शकत नाही’, तेही सांगून टाक.
मोक्षदा : माझ्या कृतींमध्ये सातत्य नसते, म्हणजे एखादी कृती आज केली, तर ती उद्या होत नाही. परवा केली, तर त्याच्या पुढच्या दिवशी ती होत नाही. असे होते, तर मी काय करू ?
परात्पर गुरु डॉ. आठवले (कु. प्रार्थनाला) : तू सांग प्रार्थना.

कु. प्रार्थना : यासाठी आध्यात्मिक स्तरावर प्रार्थना करायची. स्वभावदोष निर्मूलन करायचे आहे, तर स्वयंसूचना द्यायची. त्यातून जर झाले नाही, तर शिक्षापद्धत वापरायची आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आहे ना परिपूर्ण उत्तर ! अपाला, तू सांग आणखी काही.
कु. अपाला : जेव्हा आपण सातत्याने कृती करतो, तेव्हा आणखी चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकतो. चांगले प्रयत्न केल्यावर आपली आध्यात्मिक प्रगती होते. त्यासाठी अशीही स्वयंसूचना देऊ शकतेस, ‘जर मी सातत्याने प्रयत्न केले, तर माझी प्रगती चांगल्या प्रकारे होईल !’
परात्पर गुरु डॉ. आठवले : दोन्ही उत्तरे किती सुंदर आहेत ना ! ही सर्व आपली दैवी बालके आहेत ना !
(क्रमश:)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/892190.html