गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

पणजी, १२ मार्च (वार्ता.) – गोवा विधानसभेचे ३ दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ मार्चपासून चालू होत आहे. अधिवेशनात २६ मार्च या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्याचा वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. सरकार या अधिवेशनात लेखानुदान मागण्या संमत करून घेणार आहे आणि पुढील अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा केली जाणार आहे.
‘अर्थसंकल्पाचा कालावधी अल्प ठेवला आहे’, असे पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘या अधिवेशनात आम्ही अर्थसंकल्प संमत करणार नाही, तर लेखानुदान संमत करणार आहोत.’’
अधिवेशन अल्पकालीन असल्याने विरोधकांची कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नापसंती
पणजी विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन अल्पकालीन असल्याने आणि विधानसभेत दिली जाणारी आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली. सरकारी विधेयके ४८ घंट्यांपूर्वी मिळायला पाहिजेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे आमदार वेंझी व्हिएगस आदींची उपस्थिती होती. ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई आजारी असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु त्यांनी सभापतींना पत्र लिहून अधिवेशन अल्प काळाचे ठेवल्याने तीव्र नापंसती व्यक्त केली. ‘सरकार विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास घाबरते; म्हणूनच अल्प काळाचे अधिवेशन ठेवले आहे’, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. बैठकीविषयी माहिती देतांना सभापती रमेश तवडकर म्हणाले, ‘‘विधानसभा कामकाज सल्लागार समिती ही विधानसभेचा कालावधी ठरवत नसते, तर हा निर्णय सरकार आणि मंत्रीमंडळ यांचा असतो. कामकाज सल्लागार समिती ही केवळ कामकाज कशा प्रकारे घ्यायाला पाहिजे, यावर निर्णय घेत असते.’’