
१. मनुस्मृती फाडल्याप्रकरणी राजदच्या प्रवक्त्या प्रियंका भारती यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद
अलीगड येथे ‘इंडिया टीव्ही’ आणि ‘टीव्ही ९ भारत वर्ष’ या दोन वृत्तवाहिन्यांच्या वतीने थेट चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील ‘पीएच्.डी.’ची विद्यार्थिनी आणि बिहारमधील राजद पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका भारती यांनी सहभाग घेतला होता. हे चर्चासत्र चालू असतांना प्रियंका भारती यांनी मनुस्मृतीची पाने फाडली आणि हिंदूंसाठी पवित्र असलेल्या ग्रंथाची अवहेलना केली. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या. या घटनेनंतर २८.१२.२०२४ या दिवशी ‘राष्ट्रीय सवर्ण परिषदे’चे संघटनमंत्री श्री. भरत तिवारी यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ‘इंडिया टीव्ही’चे मालक रजत शर्मा, ‘टीव्ही ९ भारत वर्ष’चे मालक वरुण दास आणि प्रियंका भारती यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना विनंती केली. भरत तिवारी यांचे म्हणणे होते की, उत्तरदायी पक्षाच्या प्रवक्त्यांनी हे दायित्वशून्य कृत्य केले आहे आणि ते सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करू शकते. त्यानुसार प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आला.

२. भारती यांच्यावरील गुन्हा रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार
वरील फौजदारी गुन्हा रहित करण्यासाठी प्रियंका भारती यांच्याकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली. या वेळी प्रियंका भारती म्हणाल्या, ‘‘वरील घटना ही चर्चेच्या वेळी वादविवाद चालू असतांना घडली. संबंधित विषयावर काही प्रश्न विचारले जात असतांना ही घटना घडली. त्यामुळे माझा हेतू सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करणारा नव्हता.’’ निवाडा करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय पिठाचे न्यायमूर्ती बिर्ला आणि न्यायमूर्ती गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या वृत्तनिवेदक अमित देवगण यांच्या प्रकरणाचा संदर्भ दिला अन् प्रियंका भारती यांच्यावरील फौजदारी गुन्हा रहित करण्यास नकार दिला. या वेळी त्यांनी ‘मनुस्मृती’ हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ असल्याचे सांगितले.
३. हिंदूंसाठी दिलासा देणारा उच्च न्यायालयाचा निवाडा
उच्च न्यायालय पुढे म्हणाले, ‘‘प्रभावशाली व्यक्ती सामाजिक जीवनात असे द्वेषपूर्ण कृत्य करतात. त्यामुळे हिंसाचार भडकू शकतो. त्यामुळे प्रभावशाली व्यक्तींनी दायित्वाने वागले पाहिजे. उच्चशिक्षित असतांना आणि एका राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून चर्चेत भाग घेतला असतांना त्यांच्याकडून अनावधानाने किंवा अज्ञानाने हे कृत्य झाले, असे आम्ही म्हणू शकत नाही. भारतीय न्याय संहितेचे कलम २९९ प्रमाणे लावलेल्या गुन्ह्यानुसार अन्वेषण होऊन खटला चालला पाहिजे.’’ ‘एखाद्या धर्माविषयी अवमानकारक, मानहानीकारक आणि जाणीवपूर्वक दुर्भावनापूर्ण कृत्य करणे योग्य नव्हे’, अशी टिपणीही न्यायालयाने या वेळी केली.
४. पेराल तसे उगवेल !
प्रियंका भारती यांना त्यांच्या पक्षप्रमुखांनी जे संस्कार दिले, तेच त्यांच्याकडून प्रकट झाले. त्यांच्या पक्षाने महाकुंभमेळ्याविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केले होते. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी श्रीरामजन्मभूमीसाठी काढलेली रथयात्रा बिहारमध्ये अडवून राजदने हिंदुद्वेष प्रकट केला. धर्मांधांनी ५९ हून अधिक रामभक्तांना रेल्वेत जिवंत जाळल्यानंतरही त्यांची पाठराखण केली. चारा घोटाळ्यासारखे घोटाळे केल्याप्रकरणी राजदचे लालू प्रसाद यादव यांना उतारवयात कारावासात रहावे लागले. यातून ही मंडळी बोध घेत असल्याचे दिसत नाही.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (९.३.२०२५)