सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्‍ह्यांत खनिज तेलाचे साठे सापडले !

  • ८ वर्षांपासूनच्‍या संशोधनाला आले यश !

  • देशाचे तेल उत्‍पादनात आत्‍मनिर्भर होण्‍याच्‍या दृष्‍टीने आणखी एक पाऊल !

मुंबई – अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्‍ह्यांच्‍या सागरी क्षेत्रांत खनिज तेलाचे नवे साठे सापडले आहेत. अरबी समुद्रात ८ वर्षांपासून याविषयी संशोधन चालू होते. त्‍याला आता यश आले आहे. या तेलसाठ्यांमुळे भारतातील तेलाचे उत्‍पादन ४ पटींनी वाढण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे, तसेच हे साठे ‘भारताला तेल उत्‍पादनात आत्‍मनिर्भर बनवण्‍यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील’, असे म्‍हटले जात आहे. या साठ्यांमुळे दोन्‍ही ठिकाणी स्‍थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्‍ध होऊ शकणार आहे. अरबी समुद्रात पालघर जिल्‍ह्यातील डहाणूच्‍या समुद्रात ५ सहस्र ३३८ आणि सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात मालवण येथील समुद्रात १३ सहस्र १३१ चौरस कि.मी. क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. त्‍या ठिकाणी केंद्रीय तेल उत्‍पादन आस्‍थापने लवकरच पुढील संशोधनाद्वारे उत्‍खनन करणार आहेत. वर्ष २०१७ मध्‍ये सापडलेल्‍या साठ्यांच्‍या तुलनेत हे तेलसाठे मोठे आहेत.