शौर्यजागृती होत आहे…!

छत्रपती संभाजी महाराज

गड-दुर्गांवरील पावित्र्य जपणे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी शौर्य निर्माण करणारे प्रसंग युवकांना सांगणे, हे गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा चालू झाले आहे. त्यांच्या शौर्यावर आधारित चित्रपटांना दर्शक भरभरून प्रतिसाद देत आहेत. गेल्या ४-५ वर्षांत मराठी विरांची शौर्यगाथा दर्शवणारे १० हून अधिक चित्रपट आले. अनेकांना ते आवडले. याचा परिणाम म्हणून कि काय, गड-दुर्गांवर आज आबालवृद्धांनी भेट देण्याचे प्रमाणही वाढले आहे ! काही खासगी पर्यटक आस्थापने पर्यटकांना गड-दुर्गांवर आवर्जून नेत आहेत; ज्यामुळे आपल्या छत्रपतींच्या, शूर मावळ्यांच्या पराक्रमास उजाळा मिळू लागला आहे. ‘शत्रूला नामोहरम करणारे शिवरायांसारखे शौर्य स्वतःत यायला हवे’, असा विचार तरी हिंदुत्वनिष्ठांमध्ये चालू झाला आहे.

नुकताच मलाही अनपेक्षितपणे पावनखिंडीला भेट देण्याचा योग आला. हिंदवी स्वराज्यनिर्मात्यासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या बाजीप्रभु देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या पावनखिंडीच्या दर्शनाने खरोखरच लढाऊवृत्ती जागृत होते. तेथे आलेल्या आबालवृद्धांची जिज्ञासा आणि ‘पावनखिंडीमधील नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा लढा कसा झाला असेल ?’, याविषयीची चर्चा ऐकून पुष्कळ चांगले वाटले. तेथे येणारा प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्याविषयीच्या घोषणा देत होता. अनेक जण पावनखिंडीतील प्रत्यक्ष युद्धाच्या ठिकाणी जाण्यासाठीही प्रयत्न करत होते. युवकांमध्ये जागृत झालेली ही जिज्ञासा नक्कीच प्रेरणादायी आहे; परंतु आता युवकांनी एवढ्यावरच न थांबता हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांनीही जो त्याग केला, ती भावना स्वतःमध्ये निर्माण करायला हवी. आता रायगड, पन्हाळा, विशाळगड, प्रतापगड, पावनखिंड अशा प्रत्येक ऐतिहासिक गड-दुर्गांवर छत्रपतींनी जे शौर्य गाजवले, वीर मावळ्यांनी जो लढा दिला, याचा इतिहास सांगणारी चलचित्रे, प्रदर्शने कायमस्वरूपी उभारण्याची आवश्यकता आहे. एकीकडे औरंग्याच्या कबरीसाठी लाखो रुपये खर्चासाठी दिले जात आहेत; पण आपली ऐतिहासिक, शौर्यजागृती करणारी स्थळे मात्र दुर्लक्षित दिसतात, ही वस्तूस्थिती आहे. ती पालटण्यासाठीचे प्रयत्न चालू झाले, तर आणि तरच बाजीप्रभु यांच्यासारख्यांनी दिलेल्या लढ्याची प्रेरणा आणि ते सळसळते रक्त येणार्‍या पिढीमध्ये निर्माण होऊ शकेल. त्यामुळे केवळ घोषणा आणि ‘रिल्स’ (१-२ मिनिटांच्या चित्रफीती) यांपुरते मर्यादित न रहाता हिंदवी स्वराज्यासाठी त्याग करण्याची प्रेरणा या पिढीला मिळो, हीच शिवशंभोचरणी प्रार्थना !

– श्री. वैभव आफळे, गोवा.