जिलेटिन स्फोटांमुळे ‘तिलारी’ धरणाला धोका पोचणार असल्याचे प्रकरण

पणजी, १२ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘तिलारी’ धरणाचे अस्तित्व सध्या संकटात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरण क्षेत्रातील खानयाळे-शिरंगे परिसरात गौण खाणी (काळा दगड) उत्खननासाठी करण्यात येत असलेल्या अमर्याद जिलेटिन स्फोटांमुळे धरणाला धोका पोचण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलतांना गोव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील तिलारी परिसरात जिलेटिन स्फोट (ब्लास्टिंग) हे केवळ उन्हाळ्यातील २-३ मासांतच केले जातात आणि त्या वेळी धरणातील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या अल्प असते. यामुळे या स्फोटांचा धरणावर फारसा परिणाम होणार नाही, असे माझे मत आहे. सरकारला अद्याप तेथे चालणार्या खाणकामाची कायदेशीर स्थिती ठाऊक नाही; मात्र जर खाणींचा काही परिणाम होणार असेल, तर आम्ही तेथील अभियंत्यांशी चर्चा करून खाणकाम थांबवण्यास सांगू. गोव्याच्या जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्याने महाराष्ट्र सरकारला या संदर्भात चौकशी अहवाल मागवण्यासाठी पत्र पाठवले आहे, तसेच मुख्य अभियंत्याने संबंधित अभियंत्याशी चर्चाही केली आहे.’’
गोवा जलस्रोत खात्याच्या अधिकार्यांनी १२ मार्च या दिवशी खाण स्थळाला भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला आहे. संबंधित अधिकारी लवकरच राज्य सरकारला त्यांचा अहवाल सादर करणार आहेत.
तिलारी धरणाजवळचे खाणकाम त्वरित बंद करा ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी
तिलारी धरणाजवळ चालू असलेल्या अनधिकृत कामांची महाराष्ट्र आणि गोवा सरकार यांनी तातडीने नोंद घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी गोव्यातील पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केली आहे.
जिलेटिन स्फोटांच्या विरोधात खानयाळे-शिरंगे परिसरातील ग्रामस्थ गेले ७ दिवस करत आहेत उपोषणमहाराष्ट्रातील खानयाळे-शिरंगे परिसरातील ग्रामस्थ तिलारी धरणाच्या जवळ चालू असलेल्या जिलेटिन स्फोटांच्या विरोधात गेल्या ७ दिवसांपासून उपोषण करत आहेत. सततच्या स्फोटांमुळे धरणाचा पाया कमकुवत होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हे धरण गोवा आणि महाराष्ट्रया दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा अन् सिंचनाचा स्रोत आहे. |