नागोठणे (जिल्हा रायगड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निवेदनानंतर पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम चालू !

बांगलादेशींची माहिती देण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन !

प्रतिकात्मक छायाचित्र

रायगड – जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी ‘नागोठणे परिसरातील रहिवासी, कामगार, हातगाडी विक्रेते, फिरते विक्रेते यांचे आधारकार्ड पडताळून बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम राबवावी’, अशी मागणी कोलाड पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. पोलिसांनी या निवेदनाची नोंद घेत नागोठणे परिसरातील बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम चालू केली आहे, तसेच गावातील नागरिकांना त्यांची माहिती मिळाल्यास त्वरित कोलाड पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन केले आहे.

नागोठणे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना पोलिसांना साहाय्य करणार !  

नागोठणे येथे बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढल्याने या विरोधात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित झाल्या आहेत. यामध्ये हिंदु जनजागृती मंच नागोठणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रज्ञा भारती, वारकरी संप्रदाय, सनातन संस्था या विविध संघटनांनी एकत्र येऊन बैठक घेतली आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयी पोलीस ठाण्यात निवेदन दिले. रोहा येथील पोलीस उपअधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले. पोलीस बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम राबवण्याविषयी प्रत्यक्ष कृती करत आहेत का ?, याकडे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना लक्ष ठेवून आहेत.

बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम राबवून कठोर कारवाई करावी ! –  हिंदुत्वनिष्ठांची निवेदनाद्वारे मागणी

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ह.भ.प. बापू रावकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागोठणे परिसरात बांगलादेशींसाठी शोधमोहीम राबवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. ‘रिलायन्स’ आस्थापनाच्या नवीन प्रकल्पांवर असलेल्या नवीन कामगारांची चौकशी करावी. मिरानगर नागोठणे येथे बांगलादेशींची वस्ती वाढत आहे. तेथील प्रत्येक रहिवाशाचे आधारकार्ड पडताळून चौकशी करावी.

बैठकीत उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पदाधिकारी

वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बापू रावकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री योगेश ठाकूर, मयूर नाईक, चेतन कामथे, मयूर शिर्के, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वश्री मंदार परांजपे, कैलास परदेशी, पंचम परदेशी, केतन नांदगावकर, स्वावलंबी भारत अभियानाचे श्री. संदेश जाधव, भाजपचे सर्वश्री गणेश घाग, धनराज उमाळे

कोलाड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन्.एस्. पाटील यांनी ह.भ.प. बापू रावकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,

१. नागोठणे येथे बांगलादेशी नागरिकांची माहिती देण्याविषयी पोलीस पाटील यांच्या वतीने दवंडी देण्यात आली आहे. जर बांगलादेशी अथवा परप्रांतीय नागरिक सापडल्यास त्वरित कोलाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलीस पाटील यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकीत सांगितले आहे.

२. कोलाड पोलीस ठाण्यात घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकीत परप्रांतियांची माहिती पोलीस ठाण्यास कळवण्याविषयी सांगण्यात आले होते.

३. प्रबोधनपर फलक विविध ठिकाणी लावण्याचे ठरवण्यात आले आहे. तुमचे (हिंदूंनी दिलेले) आवेदन दप्तरी धारिका म्हणून ठेवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सांगितल्यावर काम करणारे पोलीस ! पोलिसांनी स्वतःहून त्यांचे कर्तव्य बजावायला हवे !