ठाणे, १० मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. गड-दुर्गांच्या धर्तीवरील देशातील विविध मंदिरांच्या शैलींचा प्रभाव असलेल्या या मंदिराचे क्षेत्रफळ अडीच सहस्र चौरस फूट असून तटबंदी ५ सहस्र चौरस फूट इतकी आहे. हे मंदिर ४ एकर जागेवर विस्तारलेले आहे. मंदिराचा लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या तिथीनुसार १४ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
१. ‘शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट’ या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त डॉ. राजू चौधरी यांच्या वतीने हे मंदिर उभारण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यटन विकास होऊन स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.
२. मंदिरासाठी जवळपास ७ ते ८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यातील काही खर्च प्रतिष्ठानच्या वतीने, तर काही खर्च लोकवर्गणीतून करण्यात आला आहे. या मंदिराची रूपरेखा ह.भ.प. डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून मंदिराची निर्मिती अभियंता आणि वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी केली आहे.
३. १४ मार्च ते १७ मार्च या कालाधीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा, आध्यात्मिक दिन, सांस्कृतिक दिन आणि ऐतिहासिक दिन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा → Chatrapati Shivaji Maharaj Mandir Maradepada : मराडे पाडा (भिवंडी) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर !
४. मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची ४२ फूट असून मंदिरावर एकूण ५ कळस आहेत. गाभार्याजवळ ४२ फूट सभा मंडप, तसेच ४ कोपर्यांवर गोलाकार बुरूज असून टेहळणी मार्ग उभारण्यात आले आहेत. तटबंदीच्या आत ३६ विभाग असून त्यावर भव्य शिल्पे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून इतिहासाचे दर्शन घडवण्यात आले आहे.
५. मंदिराचे सर्व खांब कोरीव असून त्यावर महिरपी कमानी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साडे सहा फूट असून ती अयोध्यातील श्रीरामाची मूर्ती घडवणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडवण्यात आली आहे.