श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी साधकाला आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. जगदीश पाटील

१. साधकाचे ध्यान लागल्यावर परावाणीतून त्याच्या मागील काही जन्मांविषयी देवाने सांगितलेले त्याला ऐकू येणे

१ अ. दूरचित्रवाणीवर रामायण मालिकेतील हनुमान आणि सीतामाता यांचा भावपूर्ण संवाद ऐकतांना मन एकाग्र होऊन ध्यान लागणे अन् ध्यानात परावाणीतून ‘श्रीराम श्रीराम ।’ हा नामजप चालू होणे : ‘२६.८.२०२४ या दिवशी मी पुणे येथे बहिणीकडे गेलो होतो. मी दूरचित्रवाणीवर रामायण पहात होतो. त्यामध्ये हनुमान आणि सीतामाता यांच्यात अशोक वाटिका येथे भावपूर्ण संवाद चालू होता. हे दृश्य पहात असतांना मला आतून पुष्कळ आनंद होत होता. त्यानंतर माझे मन एकाग्र झाले आणि माझे ध्यान लागले. ध्यानात माझा आतून एकदम परावाणीतून ‘श्रीराम श्रीराम ।’, हा नामजप चालू झाला. या नामजपाच्या ध्वनीचे तिन्ही लोकांत कंपन होत होते.

१ आ. ‘ध्यानस्थ हनुमान रामनामाचा जप करत आहे’, असे दृश्य दिसणे, आकाशवाणीतून तू विष्णुभक्त, रामभक्त आणि कृष्णभक्त आहेस आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे; म्हणून हे दृश्य दिसत आहे’, असे देवाने सांगणे : त्या वेळी मला ध्यानस्थ हनुमान रामनामाचा जप करत आहे’, असे दृश्य दिसले. ‘मी कोणत्या लोकात आहे ?’, हे मला कळत नव्हते. समोर पांढरा शुभ्र प्रकाश दिसत होता. मी देवाला विचारले, ‘मी कोण आहे ? हे दृश्य का दिसत आहे ?’ त्या वेळी आकाशवाणीतून उत्तर आले, ‘हे त्रेतायुग आहे. तू विष्णुभक्त, रामभक्त आणि कृष्णभक्त आहेस. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. त्यामुळे तुला हे दृश्य दिसत आहे.

१ इ. ‘प.पू. डॉक्टरांच्या समवेत साधकाने प्रत्येक युगात सेवा केली आहे’, असे देवाने सांगणे : तू विष्णुभक्त असल्याने विष्णु जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतो, तेव्हा तुझाही जन्म झाला आहे.  त्रेतायुगात तू वानराच्या माध्यमातून विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाच्या समवेत रामराज्य स्थापनेच्या कार्यात सेवा केली होतीस. तसेच द्वापरयुगात विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सेवा केली होतीस. आता कलियुगात भगवान श्रीविष्णूचे जयंत अवतार असलेले प.पू. डॉक्टर यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सेवा करत आहेस.

१ ई. ‘साधकाचा जन्म केवळ ईश्वरी कार्य आणि गुरुसेवा यांसाठी झाला आहे’, असे देवाने सांगणे : तू मागील काही जन्मांपासून प.पू. डॉक्टरांच्या समवेत आहेस. ‘ज्या ज्या वेळी भगवंत धर्मकार्यासाठी पृथ्वीवर येतो, त्या त्या वेळी भक्तही जन्म घेतात.’ ही एक अवतारी लीलाच आहे. तुझा जन्म केवळ ईश्वरी कार्य आणि गुरुसेवा यांसाठी झाला आहे.’

२. परावाणीतून नामजप ऐकल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. परावाणीतील नामजप आणि सर्व माहिती ऐकून मी धन्य झालो. अर्धा घंटा माझ्या आतून ‘श्रीराम श्रीराम ।’ हा नामजप मला परावाणीतून ऐकू येत होता. तेव्हा माझे देहभान हरपले होते.

आ. माझ्या सहस्रारातून माझ्या शरिरात चैतन्याचा वर्षाव जात होता.

इ. ध्यानातून बाहेर आल्यावर ‘मी कुठे आहे ?’, हे मला कळत नव्हते. मला अशी अनुभूती पहिल्यांदाच आली.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वसूचना मिळण्याविषयी काही वर्षांपूर्वी साधकाला सांगणे 

अ. काही वर्षांपूर्वी मला धर्मसभा, वातावरणात घडणार्‍या घटना, पृथ्वीवर येणारी संकटे, साधकांवर येणारी संकटे आणि यज्ञ या घटना घडण्याआधीच ते दृश्य स्वरूपात किंवा ईश्वरी ज्ञानाच्या माध्यमातून देव सांगत असे.

आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येणार्‍या आध्यात्मिक उपायांच्या चौकटी किंवा प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या आपत्काळाविषयी चौकटीही मला ३ – ४ दिवस आधीच दृश्य किंवा ज्ञानाच्या माध्यमातून लक्षात येतात.

इ. काही वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टर मला म्हणाले होते, ‘‘पुढे तुला मागच्या आणि पुढच्या जन्माविषयीसुद्धा कळेल’’, याची मला आठवण झाली.

४. सूक्ष्म दृष्टीमुळे आश्रम बांधकामाशी संबंधित सेवेत पुष्कळ साहाय्य होणे 

या सूक्ष्म दृष्टीमुळे मला आश्रम बांधकामाशी संबंधित सेवेत पुष्कळ साहाय्य होते. मला आश्रम बांधकामातील नूतनीकरण करणे, दुरुस्ती सेवा करणे, साहित्य खरेदी करणे, ठेकेदाराशी (कॉन्ट्रक्टरशी) बोलणे आणि मूल्य पहाणे इत्यादी सेवांसाठी, तसेच बांधकामाशी संबंधित साहित्य शोधण्यासाठी आणि आणण्यासाठी नेहमी बाहेर जावे लागते.

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला आतूनच अनेक प्रसंगांत दिशा देऊन मार्गदर्शन करणे : ‘या सेवेसाठी कुठे जायचे ? कोणते दुकान चांगले आहे ? कोणते यंत्र चांगले आहे. कोणता ठेकेदार चांगला आहे ?’, हे गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला आतूनच सांगते किंवा दिशा देते. ‘कोणात भाव आहे ? कोण बुद्धीवादी आहे ? कोण फसवू शकतो ? कोणावर विश्वास ठेवायचा ?’, हे माझ्या लक्षात येते. एखाद्या घरात त्रास असेल, तर तेही माझ्या लक्षात येते. त्या वेळी त्या घरातील स्पंदने माझ्या लक्षात येतात. काही वेळा ‘मी जे बोलतो, तसेच घडते’, असे काही समाजातील ओळखीचे लोक आणि दुकानदार यांनी मला सांगितले. जे जिज्ञासू असतात, त्यांना मी साधना आणि गुरुकार्य अन् त्यांच्या अडचणीवर उपाय सांगतो.

‘प.पू. डॉक्टरच मला या सर्व अनुभूती देत असून मी निमित्तमात्र आहे’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. जगदीश पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.८.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक