आज वसंतपंचमी (२.२.२०२५) या दिवशी सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने…

१. अनंतचतुर्दशीच्या भंडार्याच्या वेळी साहित्य अपुरे असूनही सेवेतून सर्वांना आनंद मिळणे
‘अनंतचतुर्दशीचा भंडारा इंदूर येथील पालीवाल धर्मशाळेत होत असे. प.पू. भक्तराज महाराज हा भंडारा ३ दिवस करायचे. त्या वेळी धर्मशाळेत विळ्या, चाकू इत्यादी साहित्य नव्हते. आम्ही गच्चीवरून भोपळे खाली टाकायचो आणि त्यांचे तुकडे झाले की, फरशीच्या तुकड्याने त्यांचे छोटे-छोटे तुकडे करून त्यांची भाजी करायचो.३ दिवस आनंदीआनंद असायचा.
२. प.पू. भक्तराज महाराज बाहेरून फणसासारखे काटेरी; पण आतून मऊ असल्याने त्यांचा सहवास हवाहवासा वाटणे
प.पू. भक्तराज महाराज तसे शांत होते; पण ‘ते केव्हा, कुणावर आणि कशासाठी रागावतील ?’, हे सांगता येत नव्हते. ते कोणत्याही कारणाने चिडले, तर त्यांच्या समोर टिकणे कठीण असायचे. त्यांना समजावणे किंवा सांगणे अशक्य होते. ते चिडल्यावर परत इतक्या लवकर शांत होत आणि गोड गोड बोलत की, वाटायचे, ‘आपण स्वप्न तर पहात नाही ना ? थोड्या वेळापूर्वीचे दुर्वासमुनी आणि आता एकदम गोड अन् शांत असलेले महाराज एकच का ?’ प.पू. भक्तराज महाराज म्हणजे फणस ! अगदी फणसासारखे, म्हणजे वरून काटेरी-कडक; पण आतला गाभा अगदी मऊ आणि अती गोड ! म्हणूनच त्यांचा सहवास हवाहवासा वाटे.
३. महाराजांना मोठे केस आवडत नसत; म्हणून मी माझ्या डोक्यावरील केस १ ते दीड इंच लांबीचे (सोल्जर (सैनिकांसारखा) कट) ठेवायचो.
४. प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तांना प्रसाद देण्याचे मनावर बिंबवलेले महत्त्व !
एकदा अनंतचर्तुदशीचा भंडारा पार पडल्यावर ३ – ४ दिवसांनी मी आणि छोटू साळसणकर दुपारी २ वाजता प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे (प.पू. बाबांकडे) होतो. महाराज झोपले होते; म्हणून मी त्यांच्या पायाकडे आणि छोटू समोरच्या भिंतीला टेकून उभा होता. थोड्या वेळाने महाराज उठले आणि छोटूला म्हणाले, ‘‘अरे, त्या नेमीचंदकडे प्रसाद पोचवला का ?’’ छोटूने काहीच उत्तर दिले नाही. महाराजांनी जोरात चिडून विचारले. तेव्हा छोटूने ‘प्रसाद संपला’, असे उत्तर दिले. त्याचे वाक्य पुरे व्हायच्या आतच महाराजांनी मला एक थप्पड मारली आणि चिडून शिव्या देत म्हणाले, ‘‘अरे, तो नेमीचंद काय तुमच्या प्रसादाचा भुकेला आहे ? का त्याला खायला मिळत नाही ? अरे, तुम्ही काय समजता भक्तराजांना आणि भक्तराजांच्या भक्तांना ? अरे ते भावनेचे भुकेले, भक्तराजांच्या प्रेमाचे भुकेले ! नालायकांनो, तुम्हाला एवढीही अक्कल नाही की, प्रसाद संपला, तर चार आण्याची नुक्ती (बुंदी) बाजारातून विकत घ्यायची. त्यात प्रसादाच्या नुक्तीचे ४ दाणे टाकायचे आणि त्याला प्रसाद म्हणून देऊन यायचे. प्रसाद पोचताच त्याला किती आनंद झाला असता !’’ या प्रसंगातून मला ‘प्रसादाचे महत्त्व काय आहे आणि त्यामुळे माणसे अन् भावना कशी जपली जाते ?’, यांची शिकवण मिळाली. तेव्हापासून आजपावेतो प.पू. बाबांच्या जुन्या भक्तांना प्रसाद पोचवण्याचे माझे कार्य सतत चालू आहे आणि ‘प्रसाद संपला’, असे मी कधीच कुणास सांगत नाही.
५. प्रीतीचा वर्षाव करणार्या आक्का !
कधी कधी आम्हाला रामजीभैय्यांकडे जाण्यासाठी वेळ झाला, आम्ही काही कामात असलो, तर वहिनी (आक्का, रामजीदादांच्या पत्नी श्रीमती सुशीला निरगुडकर) आमची वाट पहात. मुले जेवली नाहीत; म्हणून त्याही जेवणासाठी थांबत आणि आम्ही आल्यावर जेवत, तसेच महाराज रागावले, चिडले, तर त्या आमचा पक्ष घेऊन महाराजांच्या रागापासून आमचा बचाव करत. त्याच आमची ढाल होत्या. त्या माऊलीची थोरवी मी पामराने काय गावी ?
६. श्री. गोविंद हिरवे यांच्या पत्नीला प.पू. बाबांच्या अगम्य लीलेची आलेली अनुभूती !
६ अ. मुलांच्या मुंजीसाठी बटाटे अन् साहित्य आणण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी प.पू. बाबांचे दर्शन घ्यायला गेल्याने प्रत्येक वेळी बटाटे आणणे राहून जाणे : माझ्या मुलांच्या मुंजी प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने झाल्या. त्यावरून मला एक प्रसंग आठवला. मुंज ठरल्यावर माझी धर्मपत्नी प्रतिदिन सामान आणि बटाटे आणण्याचा हट्ट करत असे. मी सुटीच्या दिवशी तिला बाजारात नेण्याचे ठरले. मी तिला ‘महाराजांचे दर्शन घेऊ आणि निघू’, असे सांगितले; पण आम्ही महाराजांकडे गेलो की, ‘दर्शनात किती वेळ जाई ?’, हे मला कळत नसे. त्यामुळे बाजार राहून जाई.
६ आ. बटाटे आणणे राहून जात असल्याने पत्नी चिडणे आणि प.पू. बाबांनी ४ कट्टे (एक कट्टा म्हणजे ५० किलो) बटाटे दिल्यावर प.पू. बाबांची लीला तिच्या लक्षात येणे : एकदा सौभाग्यवती पुष्कळ चिडली आणि म्हणाली, ‘‘आज बटाटे इत्यादी घेऊन दिले नाहीत, तर मी मुंजीत भागच घेणार नाही. प.पू. बाबांकडे घेऊन जाता आणि तिथेच थांबता.’’ मी तिला प.पू. बाबांची शपथ घेऊन सांगितले, ‘‘आज तुला बटाटे घेऊनच देईन.’’ मी पत्नीसह महाराजांकडे गेलो, त्यांचे दर्शन घेतले आणि शेवटी त्यांना नमस्कार करून निघालो. तेव्हा प.पू. बाबांनी माझ्या पत्नीला थांबवले आणि श्री. बाबूराव घळसासी (नाना) यांना बोलावले अन् ४ कट्टे (एक कट्टा म्हणजे ५० किलो) बटाटे भरून टेम्पोत टाकण्यास सांगितले. ते बटाटे, म्हणजे कांदळीच्या शेतातले पहिले पीक होते. एक-एक बटाटा अर्ध्या किंवा १ किलोचा होता. प.पू. बाबांनी हे बटाटे तिला देण्यास सांगितले. तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती रडू लागली अन् तिने प.पू. बाबांना नमस्कार केला. तिला प.पू. बाबांची लीला आणि प.पू. बाबांचे माझ्यावरचे प्रेम समजले. ‘प.पू. बाबांना भक्तांची किती काळजी असते !’, हे तिला कळले. प.पू. बाबांनी दिलेले बटाटे मुंजीच्या कार्यक्रमात पुरून उरले. त्या बटाट्यांपासून बनवलेल्या बटाटेवड्यांची चवच निराळी होती.
७. प.पू. भक्तराज महाराज यांचे लागलेले वेड !
मला प.पू. भक्तराज महाराज यांचे असे वेड लागले की, प.पू. महाराज जेथे जातील, तेथे मी जात असे. प.पू. महाराज टांग्यातून भजनांसाठी किंवा कुठे बाहेर जात असत. तेव्हा आम्ही टांग्याच्या मागे वेगाने पायी किंवा पळत जात असू किंवा प.पू. बाबा कुठे बाहेरगावी जायला निघाले की, ते जोपर्यंत दृष्टीआड होत नाहीत, तोपर्यंत त्यांना पहात उभे रहात असू.
८. प.पू. भक्तराज महाराज उत्तराधिकारी झाल्यानंतरच्या प्रारंभिक काळात त्यांना शक्य तेवढे आर्थिक साहाय्य करणे
प.पू. भक्तराज महाराज यांचा तो काळ (श्री अनंतानंद साईश यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित झाल्यानंतरचा काळ) अगदी प्रारंभिक असल्याकारणाने प.पू. महाराजांचे सर्व कार्य त्यांच्या जवळच्या भक्तांवर अवलंबून होते. अशा वेळी नोकरी लागल्यावर प.पू. बाबांना साहाय्य म्हणून कार्यालयातून जेवढा बिनव्याजी पैसा मिळे, उदा. ‘सणांसाठी (उत्सवासाठी) ॲडव्हान्स’, ‘ग्रेन ॲडव्हान्स’, ‘सायकल ॲडव्हान्स’ किंवा ३ मासांनी ‘जी.पी.एफ्. ॲडव्हान्स’ काढून देणे, तसेच मी पतपेढी बँकेचा सभासद असल्याने जमानती (काहीतरी गहाण ठेवून) कर्ज काढणे आणि ६ – ७ हप्ते भरले गेले की, पुन्हा त्याचे नूतनीकरण करून पैसे देणे. अशा प्रकारे महाराजांनी माझ्याकडून ही आर्थिक सेवा करून घेतली. त्या वेळी महाराजांना पैशांची पुष्कळ आवश्यकता होती. ते काहीही करू शकत होते; पण आपली शक्ती न दाखवता भक्तांच्या कल्याणासाठी ते भक्तांच्या खिशातलेच पैसे घेत.
९. प.पू. बाबांनी बोलावल्यावर तात्काळ त्यांच्याकडे जाणे
महाराज ज्या ज्या वेळी मला बोलवायचे, ती वेळ कोणतीही असो, मी आज्ञापालन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही हे नक्की ठाऊक होते की, सुधाकरला बोलावले, तर तो अवश्य येईल. पूजा करत असतांना महाराजांचा निरोप आल्यावर मी देव पाण्यात ठेवून त्यांच्याकडे जात असे. कार्यालयात महाराजांचा निरोप आला, तर मी तात्काळ रजा टाकत असे, नाहीतर कामावर असतांना आजारी असल्याचे कळवून रजा घेत असे. भंडारे, भजन, यात्रा किंवा अन्य काही आदेश असेल, तर नेहमी सुटी मिळत नसे. तेव्हा आधुनिक वैद्यांचे मी आजारी असल्याचे प्रमाणपत्र देऊन मी गुरूंकडे जात असे. प्रत्येक वेळी सुटी घेत असल्याने माझी रजा शिल्लक रहात नसे.
१०. सेवानिवृत्तीच्या वेळी रजेचा एक पैसाही न मिळाल्याचे दुःख न वाटणे आणि प.पू. बाबांचा सत्संग कोटी रुपयांपेक्षा अधिक अमूल्य वाटणे
सेवानिवृत्तीच्या वेळी मात्र आमच्या खात्यात रजा शिल्लक नसल्याने आम्हाला रजेचा एक पैसाही मिळाला नाही. माझ्या समवेतच्या लोकांना सुटीचे ३ ते ४ लक्ष रुपये मिळाले; पण मला त्याचे मुळीच दुःख किंवा खंत वाटली नाही. उलट मला आनंदच होतो; कारण मोहात न पडता महाराजांचा सत्संग, जवळीक, भजन, भंडारे आणि यात्रा यांचा मला जो लाभ झाला, तो कोटी रुपयांपेक्षा अधिक अमूल्य आहे. मी ते स्वर्गसुख भोगण्यास पात्र ठरलो.
११. प.पू. बाबांनी देहत्याग केल्यावर शोकाकुल होणे आणि त्यांना निर्गुणात पाहून आश्रमात अविरत सेवा करण्याचे ठरवणे
तो काळ, ती वेळ अशी होती की, ‘जगात केवळ प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे भजन, सान्निध्य आणि संतसंग यांविना काहीच नाही’, असे वाटत होते. जणू धुंदच चढली होती. अशा या आनंदी जीवनाचा प्रवास चालू असतांना वर्ष १९९५ ची गुरुपौर्णिमा झाली. प.पू. भक्तराज महाराज यांची प्रकृती अस्वस्थ झाली. ते इंदूरला आले. तेव्हा त्यांना रुग्णालयात भरती केले. आधुनिक वैद्यांनी अनेक उपचार केले. त्यांनी आपल्या परीने सर्व उच्च स्तरीय प्रयत्न केले; पण जे प.पू. बाबांना मंजूर होते, तेच झाले. प.पू. बाबा रुग्णालयात भरती असतांना मी स्वतः आणि सर्वश्री ठुसेकाका, नंदू (प.पू. बाबांचा मोठा मुलगा), राजू निरगुडकर (रामजीदादांचा मुलगा), बंडू पोळ, असे रुग्णालयात होतो. ती रात्र ‘काळरात्र’ ठरली. आम्ही प.पू. बाबांना प्रत्येक एक घंट्याने जाऊन बघत होतो आणि रात्री २ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी (आधुनिक वैद्यांनी) सांगितले, ‘‘आता तुमचे बाबा राहिले नाहीत.’’ आम्ही एकदम घाबरलो आणि रडवेले झालो. मी प.पू. बाबांच्या अंगावर स्वतःला झोकले आणि म्हणालो, ‘‘असे होऊ शकत नाही.’’ ‘आता कोण आपल्याला प्रेमाने आणि आपुलकीने ‘सुधाकर’ म्हणून हाका मारील ? मी शून्यात तर जात नाही ना ?’, असा विचार मनात येऊन ‘माझ्या पायाखालची भूमी सरकत आहे’, असे मला वाटले. माझ्या जीवनाचा सूर्य मावळला. प.पू. भक्तराज महाराज सगुणातून निर्गुणात गेले. ‘आठवण हीच सुखाची ठेव आहे’, या महाराजांच्या उक्तीप्रमाणे आता प.पू. बाबांना निर्गुणात बघायचे. ‘आश्रम हीच बाबांची कर्मभूमी आहे’, हे न विसरता अविरत सेवा करायची’, असे मी ठरवले.’
(क्रमशः)
– श्री. गोविंद सदाशिव हिरवे (प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त) (साभार : ‘भक्तराज’)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |