धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया ! – मीनाक्षी सहरावत, संस्‍थापिका, सनातन महासंघ आणि वैदिक मिशनरी 

सनातन महासंघ आणि वैदिक मिशनरीच्‍या संस्‍थापिका मीनाक्षी सहरावत, तसेच समवेत ‘भारत भारती संस्‍थे’चे पदाधिकारी, मान्‍यवर आणि अन्‍य

अहिल्‍यानगर – धर्म, इतिहास, संस्‍कृती ठाऊक नसलेले लोक हे मूळ नसलेल्‍या झाडाप्रमाणे असतात. त्‍यामुळे आपल्‍या धर्माविषयी, संस्‍कृतीविषयी अभिमान बाळगून तो जपा. धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया असून त्‍यांच्‍या आधारशिलेनेच भारत भविष्‍यात विश्‍वगुरु होणार आहे, असे प्रतिपादन सनातन महासंघ आणि वैदिक मिशनरीच्‍या संस्‍थापिका मीनाक्षी सहरावत यांनी केले. राष्‍ट्रीय एकोप्‍यासाठी काम करणार्‍या ‘भारत भारती संस्‍थे’च्‍या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त संजोग लॉन अहिल्‍यानगर येथे भारतमाता पूजन, देशातील सर्व राज्‍याच्‍या खाद्य संस्‍कृतीचे ‘फूड फेस्‍टिव्‍हल’ आणि देशभक्‍तीपर सांस्‍कृतिक कार्यक्रम या त्रिवेणी कार्यक्रमात मीनाक्षी सहरावत प्रमुख वक्‍त्‍या म्‍हणून बोलत होत्‍या.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी इस्‍कॉनचे विचारवंत मदन सुंदरदास (प्रभुजी) होते. या वेळी व्‍यासपिठावर प्रमुख पाहुणे भारत भारतीचे केरळ प्रांतचे अध्‍यक्ष डॉ. आर्. अजयकुमार, स्‍पेशल ऑलिम्‍पिकच्‍या नगरच्‍या अध्‍यक्षा धनश्रीताई विखे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. भारतमाता, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या प्रतिमा पूजन, दीपप्रज्‍वलन आणि श्री गणेश वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला.

भगवान श्रीकृष्‍णाने सांगितलेल्‍या भगवद़्‍गीतेत आजचे संविधान आहे; म्‍हणून भगवान श्रीकृष्‍णाने दिलेली ‘भगवद़्‍गीता’ या आध्‍यात्मिक शक्‍तीचे सर्वांनी एकदा तरी वाचन करावे, असे मत विचारवंत मदन सुंदरदासजी यांनी व्‍यक्‍त केले. ‘भारत भारती’ केरळ प्रांतचे अध्‍यक्ष डॉ. आर्. अजयकुमारजी यांनी केरळ प्रांतात होत असलेले हिंदूंचे धर्मांतर रोखण्‍यासाठी ‘भारत भारती’ करत असलेल्‍या कार्याची माहिती दिली.