(क्रूझ टर्मिनल म्हणजे पर्यटक नौकांसाठीचे बंदर)
पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) – पर्वरी येथे मंत्रालयामध्ये गोवा पर्यटन विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर उपस्थित होते. या बैठकीत गोव्यातील पर्यटन व्यवसायाला बळकटी आणण्यासाठी महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा करण्यात आली. क्रूझ टर्मिनलवर वाय-फाय, स्नानगृह, विश्रामगृह, हॉटेल्स आणि इतर सुविधा पुरवून गोवा हे पर्यटन नौकांसाठी महत्त्वाचे बंदर म्हणून स्थापित करणे, यावर चर्चा करण्यात आली. वाहतुकीला चालना देण्यासाठी विमानतळ, रेल्वेस्थानक आणि क्रूझ टर्मिनल या ठिकाणी टॅक्सीच्या शुल्कावर नियंत्रण ठेवून त्या ठिकाणी टॅक्सी भाड्याने घेणार्याला समान शुल्क आकारले जावे, तसेच ‘रेंट अ कार’ (चारचाकी वाहन भाड्याने देणे) या सेवेवर कडक नियंत्रण ठेवण्यात यावे, असा प्रस्ताव महामंडळाकडून मांडण्यात आला. गोव्याच्या पर्यटनक्षेत्राची अपकीर्ती रोखण्यासाठी एकादश तीर्थ सर्कीट आणि जागतिक मोहिमा यांना चालना देणे, सहलींविषयी माहिती करून देणे आणि ध्येय ठेवून परदेशी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रसिद्धी करणे, या उपाययोजना सुचवण्यात आल्या.
बैठका, प्रोत्साहन कार्यक्रम, परिषदा, प्रदर्शने आणि लग्ने या कार्यक्रमांसाठी गोव्याकडे आकर्षित करणार्या या कार्यक्रमांना मान्यता देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना (सर्व शासकीय अनुमत्या एकाच ठिकाणी मिळण्याचे ठिकाण) असावी, असे सुचवण्यात आले.