पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) – गोवा शिक्षण मंडळाची इयत्ता १२ वीची प्रात्यक्षिक परीक्षा आणि आय.आय.टी. प्रवेशासाठी असलेली ‘जेईई मेन्स’ या परीक्षांचे दिनांक एकाच दिवशी असल्याने गोवा शिक्षण मंडळाने १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात पालट केला आहे. या विषयीचे सुधारित परिपत्रक उच्च माध्यमिक विद्यालयांना पाठवण्यात आल्याची माहिती गोवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी दिली आहे. ‘जेईई मेन्स’ ही परीक्षा २० जानेवारी ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. विविध उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये १२ वी विज्ञान शाखेच्या प्रात्यक्षिक परीक्षा १३ जानेवारीपासून चालू झाल्या आहेत. १३ ते २० जानेवारी या कालावधीत उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा होतील. २१ ते २४ जानेवारी या कालावधीतील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा ‘जेईई मेन्स’ परीक्षा झाल्यानंतर १, ३ आणि ४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी होतील. यामुळे १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ‘जेईई मेन्स’ परीक्षेला बसणे शक्य होणार आहे.