नायलॉन मांजाविरोधात राज्यात झालेली ही पहिलीच कारवाई !
नाशिक – संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मांजाचा वापर करणार्या ११ अल्पवयीन मुलांच्या पालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. नायलॉन मांजाविरोधात राज्यात झालेली ही पहिलीच कारवाई आहे. १२ आणि १३ जानेवारी या २ दिवसांत मांजा वापर करणार्या ७४ विक्रेत्यांसह वापरकर्ते आणि पालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंद करण्यात आले. येवला येथेही पतंगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मांजामुळे ३ जण घायाळ झाले आहेत.
शहरातील विविध परिसरात सापळा रचून धाड घालत कारवाई !
घातक नायलॉन मांजाचा वापर करणार्यांवर प्रतिबंधक कारवाई न करता थेट तडीपारीची कारवाई करण्यात येत असल्याने काही प्रमाणात वापरावर निर्बंध आले होते; मात्र वडाळा नाका येथे मांजाने गळा चिरून युवकाला ७४ टाके पडले. सुदैवाने त्याचा जीव वाचला. याची गंभीर नोंद घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मांजाची विक्री आणि वापरकर्ते यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. याची नोंद घेत १३ पोलीस ठाण्यांची २६ पथके आणि गुन्हे शाखेच्या ५ पथकांनी शहरातील विविध परिसरात सापळा रचून धाड घालत एकाच दिवशी २४ गुन्हे नोंद केले.
गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाच्या १० वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान !
सरकारी अधिवक्ता रवींद्र निकम यांनी सांगितले की, सदोष मनुष्यवधाच्या या गुन्ह्यात दोषारोपपत्र प्रविष्ट केल्यानंतर वस्तूनिष्ठ आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. भारतीय न्याय संहितेच्या नव्या कलमांनुसार या प्रकरणात १० वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते.