नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचेच नाव लागणार ! – गणेश नाईक, वनमंत्री

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव

नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचेच नाव लागणार आहे, असे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थे’च्या वतीने दि.बा. पाटील यांच्या ९९ व्या जयंतीच्या निमित्ताने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

गणेश नाईक म्हणाले की, विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचेच नाव लागणार, हा विश्वास आहे; कारण नामकरण चळवळ सर्वांनीच मनावर घेतली आहे. लवकरच राज्य आणि केंद्र स्तरांवर शासकीय सोपस्कार पार पडून जनभावनेच्या आदरातून निर्णय होईल.

दशरथ भगत म्हणाले की, दि.बा. पाटील यांनी संघर्ष करून पीडितांना न्याय दिला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पीडित घटकांच्या न्यायासाठी चळवळ निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संघर्षातून साडेबारा टक्के योजना लागू झाली. त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून विमानतळास त्यांचे नाव देण्यात यावे.

या प्रसंगी दि.बा. पाटील यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी जीवनाचे चित्रप्रदर्शन, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिक, कचरावेचक भगिनी, कर्तव्यदक्ष महिला रिक्शाचालक भगिनी आणि अन्य उल्लेखनीय सामाजिक योगदान देणार्‍या व्यक्तींचा सन्मान, पाणपोई लोकार्पण असे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.