Indian Army Chief On Border Situation : उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली, तरी नियंत्रणात ! – सैन्यदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी

सैन्यदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी

नवी देहली – देशाच्या उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली, तरी नियंत्रणात आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी चिनी नेत्यांशीही चर्चा केली आहे. मी माझ्या सर्व सह-कमांडर्सना गस्तीसंदर्भात भूमीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तेथील प्रश्‍न सैन्य पातळीवरच सोडवले जाऊ शकतात. सीमेवर आमची क्षमता वाढवतांना आम्ही विशेष तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे, अशी माहिती भारताचे सैन्यदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांनी देशाच्या सर्व सीमेवरील सुरक्षेविषयी माहिती दिली. त्यांनी चीन आणि म्यानमार सीमा, तसेच मणीपूर येथील हिंसाचार संदर्भात माहिती दिली.

सैन्यदल प्रमुख यांनी मांडलेली सूत्रे

काश्मीरमध्ये सध्या सक्रीय असलेले ८० टक्के आतंकवादी पाकिस्तानी !

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या सक्रीय असलेले ८० टक्के आतंकवादी पाकिस्तानातील आहेत. वर्ष २०२४ मध्ये मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांपैकी ६० टक्के पाकिस्तानी होते. सध्या काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती नियंत्रणात आहे.

काश्मीरमध्ये आतंकवादाकडून पर्यटनाकडे आपण हळूहळू वाटचाल करत आहोत !

फेब्रुवारी २०२१ मध्ये पाकसमवेत झालेला युद्धविराम करार अजूनही चालू असला, तरी सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत उत्तर काश्मीर आणि डोडा-किश्तवाड पट्ट्यात आतंकवाद्यांच्या कारवाया दिसल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. गेल्या वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडल्या आहेत. मोठ्या पालटाची ही चिन्हे आहेत. आतंकवादाकडून पर्यटनाकडे आपण हळूहळू वाटचाल करत आहोत.

बांगलादेशात निवडून आलेले सरकार आल्यावर संबंध ठरतील !

बांगलादेशातील सत्तापालटाच्या वेळी मी त्यांच्या सैन्यदल प्रमुखांच्या संपर्कात होतो; पण आता तिथे निवडून आलेले सरकार येईल, तेव्हाच आपण बांगलादेशासमवेतच्या संबंधांबद्दल बोलू शकतो.

मणीपूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात !

उत्तर-पूर्व भागातही परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. सुरक्षादलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मणीपूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मणीपूरमध्ये हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या असल्या, तरी तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्य सातत्याने काम करत आहे. सुरक्षा सुनिश्‍चित करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि वरिष्ठ अधिकारी भारत-म्यानमार सीमेवरील सर्व समुदायांच्या नेत्यांशी बोलत आहेत.

सैन्याला स्वावलंबी बनवण्याचा उद्देश

सैन्याला स्वावलंबी बनवणे आणि भविष्यातील आव्हानांसाठी सिद्ध करणे, हे माझे ध्येय आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रसारमाध्यमे आणि सुरक्षादल यांना एकत्र येण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच मी माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करतो.