गोव्यात ‘कॅसिनो’, ‘नाईट क्लब’ आणि समुद्रकिनारे या ठिकाणी सर्वाधिक ध्वनीप्रदूषण !

केंद्रीय रस्ता संशोधन संस्थेच्या अहवालातील माहिती

(म्हणे) गोवा ‘नाइटक्लब कॅपिटल ऑफ इंडिया !’

पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – गोव्यात ध्वनीप्रदूषण ही वेगाने वाढणारी एक समस्या आहे. गोव्यात वाहतूक, औद्योगिक उत्पादन, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमुळे ध्वनीप्रदूषण होत आहे. राज्यामध्ये वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे आणि यामध्ये विशेषत: दुचाकी वाहनांचा वाटा ५९ टक्के आहे. आर्लेम सर्कल, कोलवा सर्कल आणि साळगाव जंक्शन यांसारख्या भागांत वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे अन् यामुळे येथे आवाजाचा स्तर मर्यादेपेक्षा अधिक आहे. गोव्यातील ध्वनीप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी ध्वनी नकाशा, ध्वनीप्रदूषण अधिक होत असलेल्या ठिकाणांची (हॉट स्पॉट) ओळख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय रस्ता संशोधन संस्थेने सरकारसाठी हा अहवाल सिद्ध केला आहे.

अहवालात पुढे म्हटले आहे की, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनार्‍यांवर होणारे कार्यक्रम, कॅसिनो आणि ‘नाईट क्लब’ यांच्या आवाजामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाज मापन, ध्वनीप्रदूषण अधिक होत असलेल्या ठिकाणांची ओळख आणि ते नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना सिद्ध केल्या आहेत. यामध्ये वाहतुकीचे नियमन, ध्वनी प्रतिबंधक भिंती आणि जनजागृती अभियान यांचा समावेश आहे. ध्वनीप्रदूषणाचे पर्यावरण आणि आरोग्य यांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन अन् कठोर नियम यांच्या कार्यवाहीची आवश्यकता आहे. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण आणणे हे सरकार, उद्योग, पर्यटन व्यवसाय आणि स्थानिक लोक यांचे एकत्रित दायित्व आहे. वाहनांचे योग्य व्यवस्थापन करून पर्यावरणीय उपाययोजना राबवणे शक्य आहे. अहवालात सुचवलेल्या उपाययोजनांची कार्यवाही केल्यास गोव्याचे पर्यावरण संतुलित ठेवून पर्यटकांसाठीही एक चांगले वातावरण निर्माण होणार आहे.

अहवालात ध्वनीप्रदूषणाची कारणे, सर्वसाधारण ध्वनी नियंत्रण उपाययोजना, तसेच किनारी भाग, औद्योगिक क्षेत्र, जंगल क्षेत्र, शहरी भाग आदी ठिकाणचे ध्वनीप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.