पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी अर्थविषयी धोरणांवरून झाले मतभेद !
ओटावा (कॅनडा) : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी धोरणात्मक गोष्टींवर मतभेद झाल्यानंतर उपपंतप्रधान तथा अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. क्रिस्टिया देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दलचा संसदेत अहवाल मांडणार होत्या; मात्र त्याच्या काही घंटे आधी त्यांनी त्यागपत्र दिले. पंतप्रधान ट्रुडो यांनी योजनांवर खर्च करण्यासाठी सरकारी तिजोरी उघडली आहे. त्यांच्या या धोरणावर ५६ वर्षीय फ्रीलँड यांनी टीका केली. ‘वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाला हे परवडणारे नाही’, असे त्या म्हणाल्या.
फ्रीलँड यांनी ट्रुडो यांना दिलेल्या त्यागपत्रात म्हटले आहे की, कॅनडाला सर्वोत्तम मार्गावर नेण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून आपल्यामध्ये मतभेद चालू आहेत. १३ डिसेंबरला तुम्ही मला सांगितले की, तुमच्या मंत्रीमंडळात तुम्ही मला अर्थ खात्यातून मुक्त करून दुसर्या विभागाचे दायित्व देणार आहात. त्यानंतर मी विचार केला आणि मंत्रीमंडळातून बाहेर पडणे, हाच माझ्यासाठी उत्तम आणि एकमेव व्यवहार्य मार्ग असल्याचे मला उमजले.
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत !
न्यू डोमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंह यांनी फ्रीलँड यांच्या त्यागपत्रानंतर ट्रुडो यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. तसेच संसदेच्या २३ खासदारांनी त्यांच्या त्यागपत्रासाठी पत्र लिहिले आहे. दुसरीकडे ‘पंतप्रधान ट्रुडो हेदेखील त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत आहेत’, असे वृत्त कॅनडामधील माध्यमांनी दिली आहे.