प्रतापगडाच्या पायथ्याशी पार्वतीपूर नावाचे एक गाव आहे. नंतर त्याचे ‘पार’ नाव पडले. या गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पूल बांधून घेतला होता. कोयना नदी ओलांडण्यासाठी ८ मीटर रूंदीचा हा पूल प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे वर्ष १६५६-१६५८ या काळात बांधला गेला असावा. हे बांधकाम चुन्यामध्ये केलेले आहे. साडेतीनशे वर्षांनंतरही हा पूल अद्यापही एकही चिरा न ढासळता टिकून आहे. ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांना १०० वर्षे झाली; म्हणून आपण कौतुक करतो. या पुलाला ३५० वर्षे होऊनही अद्याप एकही तडा गेला नाही अथवा दगड निसटला नाही. छत्रपती शिवरायांचे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. छत्रपतींच्या काळातील विहिरी आणि तटबंदी अजूनही टिकून असल्याने त्या काळातील बांधकाम किती चांगले होते, ते कळते. सध्या व्यवस्थापन शास्त्र शिकवणार्या आणि शिकणार्या सर्वांनी छत्रपती शिवरायांचे जीवन अभ्यासण्याची अन् कार्यवाहीत आणण्याची आवश्यकता आहे.
विविध गडांचे बांधकाम, त्याची डागडुजी, प्रशासन, सैन्य अशा विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. गड-दुर्ग हे त्यांच्या स्वराज्याचा प्राण होते, त्यांचे तळ होते. गड-दुर्ग अशा ठिकाणी बांधले की, तेथे शत्रूला आक्रमण करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागायचा. गडांच्या कडेकपारी अतिशय कठीण होत्या. आत प्रवेश करण्यासाठी एकच रस्ता असायचा. त्यामुळे हे गड-दुर्ग जिंकणे सोपे नव्हते. छत्रपती शिवराय देव, देश आणि धर्म यांसाठी लढले होते. त्यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेमुळे त्यांच्या मनात प्रजेविषयी नितांत प्रेम होते. त्यामुळे त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे कौशल्य पणाला लावून यशस्वी प्रयोग केले होते आणि त्यातूनच पुढे सामान्य रयतेच्या सहभागाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्यामुळे ३५० वर्षे होऊनही छत्रपती शिवरायांनी बांधलेले भक्कम पूल अजूनही दिमाखात उभे आहेत. याउलट अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून, कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेले आताच्या काळातील कित्येक पूल शेकडो लोकांचा जीव घेत कोसळत आहेत. गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटना, एल्फिन्स्टन पूल दुर्घटना, सुखना नदीवरील पूल दुर्घटना यांसारख्या कित्येक दुर्घटनांमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. पूल बनवणारे आस्थापनाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्या गलथान कारभाराचा उत्तम नमुना, म्हणजे होणार्या दुर्घटना आणि त्यामध्ये प्राण गमावणारे लोक ! त्यामुळेच आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रासह त्यांची युद्धपद्धत, राष्ट्र उभारणीची संकल्पना, गड-दुर्गांचे वैशिष्ट्य, अभियांत्रिकी कौशल्य आदी संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक्रम चालू करावा.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे