मुंबईतील फोर्ट भागातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी ताशेरे ओढतांना उच्च न्यायालयाने सरकारला ‘कायद्यानुसार कारवाई करायची नसेल, तर जनतेला कायदा हातात घेऊ द्या’, अशा शब्दांत फटकारले आहे. नुकतेच कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातामुळे ७ जणांना जीव गमवावा लागला. ज्या ठिकाणी अपघात झाला, तो रस्ता त्या वेळी प्रचंड गजबजलेला असल्याने घटनेची तीव्रता अधिकच वाढली. मुंबईतील रेल्वेस्थानकांच्या बाहेरील रस्त्यावर फेरीवाले आणि दुकानदार यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे वाहनांनाच काय, तर पादचार्यांना चालायलाही जागा नसते. पदपथ तर फेरीवाल्यांचे अतिक्रमण करण्याचे हक्काचे ठिकाणच. त्याच्या पुढे ग्राहकांची गर्दी असते. त्यानंतर दुचाकी वाहने उभी केलेली असतात. त्यापुढे पुन्हा फेरीवाले त्यांचे दुकान घेऊन फिरत असतात. त्यामुळे पदपथावर चालण्याची सोय न राहिलेले पादचारी रस्त्याच्या मधोमध वाहनांतून वाट काढत चालतात. यातून अपघातांना निमंत्रण मिळते.
मध्यंतरी मुंबई महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई चालू केली होती. असे चांगले उपक्रम काही दिवस चालतात आणि पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ होतात, हे दुर्दैव आहे. अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाणही इतके प्रचंड आहे की, भरारी पथकाने कारवाई करून ‘स्टॉल’ गुंडाळले की, त्यांची पाठ फिरल्यावर पुन्हा मागची स्थिती जशी होती तशी झालेली असते. पोलीसही म्हणतात, ‘‘आम्ही फार तर कारवाई करू शकतो; पण फेरीवाल्यांच्या तुलनेत आमचे संख्याबळ न्यून पडते.’’ काही नागरिक कथित मानवतेच्या दृष्टीकोनातून फेरीवाल्यांवरील कारवाईला विरोध करतात.
वरकरणी असे वाटते की, पोलीस आणि प्रशासन हतबल झाले आहेत. फेरीवाले, त्यांनी व्यापलेले रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हा विषय गंभीर झाला आहे. प्रत्यक्षात या विषयाची सातत्याने चर्चा होते; मात्र त्यावर ठोस उपाय काढला जात नाही. प्रकरणाची तीव्रता वाढली किंवा काही घडले किंवा कुणी जनहित याचिका प्रविष्ट केली, तर तेवढ्यापुरती कारवाई केली जाते. परिस्थिती निवळली की, पुन्हा रस्त्यांच्या बाजारपेठा होतात आणि वाहनांच्या गर्दीतून वाट काढत चालणार्या पादचार्यांचे जीव स्वस्त होतात.
या समस्येवर खरेच उपाय काढायचा असेल, तर फेरीवाल्यांच्या मागे असलेला भक्कम पाठीराखा कोण ? हे उघड झाले पाहिजे. हातावरचे पोट असणारे फेरीवाले दिवसाला ठराविक हप्ते पोच करतात. त्यांवर कुणाचे गल्ले भरत आहेत, ती सूची उघड केल्यास सत्य समोर येईल; पण तसे होत नसल्याने कुर्ल्यासारखी घटना घडते. चर्चा होते आणि थोडा काळ गेला की, पैशाच्या जोरावर सगळी धूळ पुन्हा खाली बसते आणि सामान्य जनता जीव मुठीत धरून चालत रहाते.
– सौ. पल्लवी कणसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.