सनातन संस्‍थेच्‍या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !

रांची (झारखंड) – सनातन संस्‍थेच्‍या वतीने येथील चाईबासा भागात साधनाविषयक प्रवचनाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी सनातनच्‍या साधिका सौ. पूजा चौहान यांनी उपस्‍थित जिज्ञासूंना सांगितले, ‘‘पूजा, आरती, भजन इत्‍यादी उपासनेच्‍या प्रकारांतून देवतत्त्वाचा लाभ मिळतो; परंतु या सर्व उपासनेच्‍या आचरणाला मर्यादा आहेत. त्‍यामुळे त्‍याचा लाभही मर्यादित आहे. देवतेच्‍या तत्त्वाचा अखंडित लाभ होण्‍यासाठी देवतेची उपासना निरंतर होणे आवश्‍यक आहे. अखंड उपासनेचा एकच प्रकार शक्‍य आहे आणि तो म्‍हणजे नामस्‍मरण. नामस्‍मरण ही कलियुगातील सर्वांत सोपी आणि उत्तम उपासना आहे.’’ या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासू महिलांनी घेतला. सनातन संस्‍थेच्‍या सत्‍संगातील जिज्ञासू पुनिता वेगड यांनी या प्रवचनाचे आयोजन केले होते.

क्षणचित्रे  

१. प्रवचनानंतर उपस्‍थित महिलांनी चाईबासा भागात नियमित सत्‍संग आणि बालसंस्‍कार वर्ग चालू करण्‍याची मागणी केली.

२. एका विद्यार्थिनीचा किरकोळ अपघात झाल्‍याने तिला चालण्‍यास त्रास होत होता. असे असतांनाही ती प्रवचनासाठी उत्‍साहाने उपस्‍थित होती.