कोथरूड (पुणे) येथे हिंदु संघटनांनी धर्मांतराचा कट उधळला !

  • २ मिशनर्‍यांना पोलिसांच्या कह्यात दिले  

  • ‘बंधनमुक्त सेवा कार्य’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून धर्मांतराचे काम !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोथरूड, (जिल्हा पुणे) ९ डिसेंबर (वार्ता.) – डहाणूकर कॉलनी, कोथरूड परिसरातील गोसावी वस्तीत ८ डिसेंबरला रात्री २ वाजता मिशनर्‍यांनी गरीब हिंदु लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी फसवणूक करत धर्मांतराचा कट रचला होता; पण हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि जागरूक तरुण यांनी त्यांचा कट उधळून त्यांना पोलिसांच्या कह्यात दिले.

डहाणूकर कॉलनी जवळील गोसावी वस्तीत ख्रिस्ती धर्मप्रचारक गोपाळ रणदिवे आणि त्याची पत्नी ‘सिस्टर’ आशा रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली एक मिशनरी गट गरिबांना ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. (असे बाटगे त्यांची हिंदु नावे तशीच ठेवून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतात. अशा कावेबाज ख्रिस्त्यांकडून हिंदूंनी सावध रहावे ! – संपादक) ‘बंधनमुक्त सेवा कार्य’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून हे धर्मांतराचे काम चालू होते. रणदिवे दांपत्य लोकांना आमीष दाखवून, त्यांची दिशाभूल करून धर्मांतर करत असे. ते दोघे लोकांना एक विशेष ‘आशीर्वाद तेल’ देत होते. त्यांचा असा दावा होता की, हे तेल आरोग्याच्या सर्व समस्यांवर प्रभावी आहे. (या ‘आशीर्वाद तेला’विषयी अंनिसवाल्यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक) या प्रकरणी गोपाळ आणि आशा रणदिवे यांच्या यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकांना ख्रिस्ती धर्माकडे वळवत असल्याचे ‘व्हिडिओ’ !

स्थानिक नागरिक आणि संघटना यांनी या संबंधित ‘व्हिडिओ’ पुरावेही पोलिसांना दिले आहेत. या ‘व्हिडिओ’मध्ये ते लोकांना ‘आशीर्वाद तेल’ देत असल्याचे आणि येशूच्या कृपेचा दावा करत असून लोकांना ख्रिस्ती धर्माकडे वळवण्यासाठी दबाव टाकतांना दिसत आहेत. या पूर्वी उत्तमनगर, रामवाडी, वारजे, राहुलनगर, कोथरूड स्टँड जवळ, तेजस सोसायटी, पृथ्वी हॉटेल परिसर अशा ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम झाले आहेत. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आग्रह केला आहे. अलंकार पोलिसांनी या प्रकरणाचे पुढील अन्वेषण चालू ठेवले आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांतराचे हे प्रकार रोखण्यासाठी लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा सिद्ध होणे आवश्यक !