उजव्या पायाऐवजी रुग्णाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करणार्‍या आधुनिक वैद्यांचे फोल दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले !

देहली – उजव्या पायाच्या अस्थीभंगाच्या (फ्रॅक्चर) दुखापतीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात गेलेले रुग्ण रवि राय याच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी संतप्त रुग्णाने रुग्णालय प्रशासन आणि शस्त्रक्रिया करणारे आधुनिक वैद्य यांच्या विरोधात ‘राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगा’कडे दाद मागितली होती. आयोगाने रुग्णाला १.१० कोटी रुपयांची हानीभरपाई मिळवून दिली; मात्र नंतर रुग्णाच्या चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया करतांना झालेल्या निष्काळजीपणासाठी त्याला उत्तरदायी  ठरवणार्‍या ‘राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगा’च्या आदेशाला आव्हान देणारे आरोपी वैद्यांचे दावे सर्वोच्च न्यायालयाने २ डिसेंबरला फेटाळून लावले.

१. न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपिठाने वर्ष २०१६ मध्ये फोर्टिस रुग्णालयात अस्थिभंगतज्ञ म्हणून शस्त्रक्रिया करणार्‍या डॉ. राहुल काकरन यांचे दावे फेटाळून लावले. रुग्णाच्या दुखापत झालेल्या उजव्या पायाऐवजी त्याच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली, असा आरोप करत रुग्णाने ग्राहक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.

२. जून २०२४ मध्ये ‘राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगा’ने रुग्णाला एकूण १.१० कोटी रुपयांची हानीभरपाई दिली. यापैकी रुग्णालयाला ९० लाख रुपये आणि शस्त्रक्रिया करणार्‍या दोन आधुनिक वैद्यांना प्रत्येकी १० लाख रुपये रुग्णाला द्यावे लागले.

३. यानंतर शल्यचिकित्सकाने न्यायालयाकडे दावा केला होता की, शस्त्रक्रिया कक्षात रुग्णाच्या डाव्या पायावरही जखम आढळली होती. त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तेव्हा त्यावर रुग्णाने तोंडी संमती दिली. प्रत्यक्षात ‘राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगा’ला आढळले की, सर्व शस्त्रक्रियापूर्व चाचण्या (एक्स-रे, स्कॅन इ.) उजव्या पायासाठी घेतल्या गेल्या आणि तोंडी संमती मात्र डाव्या पायासाठी संमती घेण्यात आली.

४. ‘रुग्णालय प्रशासनाचा कारभार पाहून जीव वाचवण्यासाठी रुग्णाने स्वत:ला दुसर्‍या रुग्णालयात भरती केले’, असे आयोगाने आदेशात म्हटले आहे.

५. शेवटी खंडपिठाने म्हटले, ‘या प्रकरणाचा तपशीलवार विचार केल्यानंतर आम्ही असे मानतो की, राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग, नवी देहलीने या प्रकरणात कायदा किंवा वस्तुस्थिती यांत कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे या वैद्यांनी केलेला दावा फोल ठरल्याने आम्ही तो फेटाळून लावतो.’

संपादकीय भूमिका

आधुनिक वैद्यांच्या निष्काळजीपणाची परिसीमा ! अशांची मान्यता कायमची रहित करावी !