१. अयोध्या येथील श्री रामलल्लाचे मंदिर
१ अ. अयोध्या येथील श्रीरामाचे दर्शन घेतांना एका पोकळीत जात असल्याचे जाणवणे : ‘मी अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश केला. श्री रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी समोर आल्यानंतर मला काही क्षण स्वतःला विसरल्यासारखे झाले. त्यानंतर ‘श्री रामलल्लाच्या मूर्तीऐवजी मला तेथे एक पोकळी जाणवून त्यात मी आत आत जात आहे’, असे जाणवू लागले. माझ्या समवेत आलेल्या माझ्या पत्नीने मला हलवल्यानंतर माझे देहभान पूर्ववत् झाले. पूर्वी श्री रामलल्लाची मूर्ती दूरचित्रवाणीवरून पाहिल्यानंतर ती पुष्कळ लोभस आणि आकर्षून घेणारी वाटली होती. आता प्रत्यक्ष श्री रामलल्लाच्या मूर्तीत एक विलक्षण तेज जाणवत होते. त्यातील क्षात्रतेजयुक्त उग्रपणा वाढला असल्याचे मला जाणवले. माझ्या मनात ‘काळानुरूप हिंदूंना आवश्यक असल्यामुळे श्री रामलल्लाच्या मूर्तीत हा पालट होत असावा’, असे विचार आले.
२. काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी
२ अ. काशी विश्वनाथ मंदिरातील नंदीच्या कानात प्रार्थना केल्यानंतर तेथील पुजार्याने नंदीला वाहिलेला एक हार गळ्यात घालणे : ‘शिव ध्यानस्त असतांना त्याला काही सांगायचे असल्यास त्याच्यासमोरील नंदीच्या कानात जाऊन सांगितले की, ते शिवापर्यंत पोचते’, असे मी ग्रंथात वाचले होते. काशी विश्वनाथ येथील मंदिरात गेल्यानंतर मी तेथील नंदीच्या कानात जाऊन प्रार्थना केली, ‘परम पूज्य डॉक्टरांना दीर्घायुष्य लाभू दे. त्यांना अपेक्षित असलेले हिंदु राष्ट्र लवकरात लवकर स्थापन होऊ दे. तसेच आम्हा सर्व साधकांवर तिन्ही गुरूंची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि चित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची) कृपादृष्टी असू दे.’ हे बोलणे पूर्ण होते न होते, तोच तेथे असलेल्या पुजार्याने नंदीला अर्पण केलेला गोकर्णाच्या निळ्या फुलांचा एक हार काढून माझ्या गळ्यात घातला. जणू प्रत्यक्ष काशी विश्वनाथाने ही प्रार्थना ऐकून त्याप्रमाणे आशीर्वादही दिल्याची प्रचीती मला आली. तेव्हा माझी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. दुसर्या दिवशी रात्रीपर्यंत त्या हारातील फुले टवटवीत होती.
३. गया, बिहार येथील श्री विष्णुपाद मंदिर
३ अ. मंदिरातील गाभार्यात प्रवेश केल्यानंतर त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊन मनातील विचार थांबून शांतता जाणवणे आणि त्यानंतर आतून नामजप चालू होणे : बिहार येथे प्रवेश केल्यानंतर मला तेथील रज-तम वातावरणाचा प्रचंड त्रास होऊ लागला. माझ्यावर त्रासदायक शक्तीचे प्रचंड आवरण आले होते. प्रत्यक्ष गया येथील श्री विष्णुपाद मंदिरात प्रवेश केल्यानंतर मला पुष्कळ गारवा जाणवू लागला. मंदिरातील गाभार्यात श्री विष्णुपादाचे दर्शन घेतांना माझ्या डोक्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाले. काही क्षणांतच मला पुष्कळ हलकेपणा जाणवून उत्साह वाटू लागला. मनातील अनावश्यक, तसेच इतरही विचार थांबून शांत वाटू लागले. त्यानंतर माझा नामजप आतून चालू झाला. ‘मंदिरातील गाभार्यात जे चरणांचे स्थान आहे, तेथून एक ऊर्जेचा स्रोत सर्वत्र पसरत आहे आणि तो स्रोत बाहेरील रज-तमाला नष्ट करण्याचे कार्य करत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्या मनात ‘अन्य ठिकाणांपेक्षा या राज्यात तमोगुणाचे प्रमाण अधिक असूनही केवळ मंदिरातील चैतन्यामुळेच तेथे सर्वकाही टिकून आहे’, असा विचार आला.
४. नागवासुकी मंदिर, प्रयागराज
४ अ. नागवासुकीची मूर्ती नसून प्रत्यक्ष तोच मंदिरात असल्याचे जाणवणे : मंदिरात प्रवेश करतांना ‘मी नागलोकात आलो असून येथे सूक्ष्मातून अनेक नागांचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवले. नागवासुकी मंदिरातील नागवासुकीची मूर्ती पहातांना प्रत्यक्ष वासुकी नाग समोर असून त्याचा फणा हलत आहे. क्षणभर मला त्याचा श्वासोच्छ्वासही चालू असल्याचे जाणवले.’
– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (५.११.२०२४)
|