श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे यांचा विवाह सोहळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या दोघांनी विवाहाच्या दिवशी अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे.
१. श्री. संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. विवाहाच्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणातून साधक दांपत्याचे कौतुक करणे आणि साधक कृतज्ञताभावात रहाणे : ‘विवाहाच्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आम्हा दोघांबद्दल दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये जे लिखाण दिले होते, ते वाचून पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘श्री गुरु स्वतः अद्वितीय असूनही साधकांना अद्वितीय म्हणतात’, याबद्दल कृतज्ञता वाटू लागली. दिवसाचा आरंभच गुरूंप्रती कृतज्ञतेने झाला आणि दिवसभर मला कृतज्ञता अनुभवता आली.
मी व्यासपिठावर उभा असतांना आणि मंगलाष्टके चालू असतांनाही माझ्या मनात सतत कृतज्ञताभाव होता. ‘एरव्ही माझ्याकडून साधनेच्या प्रयत्नांमध्ये कृतज्ञता फार अल्प वेळा व्यक्त होते’, असे मला ध्यानात येते. माझे भाववृद्धीचे प्रयत्नही अल्प होतात; मात्र विवाहापूर्वी काही दिवस माझ्या मनात सतत कृतज्ञतेचे विचार येत होते. मंगलाष्टके पार पडल्यानंतर मी संतांचे आशीर्वाद घेण्यास गेल्यावर पुष्कळ कृतज्ञताभाव दाटून आला आणि बराच वेळ माझी भावजागृती झाली. आजवर माझी अशी भावजागृती झाली नव्हती. ‘विवाहाच्या दिवशी मला गुरुकृपेने कृतज्ञता आणि भावस्थिती अनुभवता आली, हीच श्री गुरूंनी आध्यात्मिक स्तरावर भेट दिली’, असे वाटून त्याबद्दलही मला कृतज्ञता वाटली.
१ आ. मधुपर्क विधीच्या वेळी श्रीविष्णु देवतेचे अस्तित्व जाणवणे : विवाहाच्या दिवशी सकाळी मधुपर्क विधी होता. या विधीत ‘वधूचे पिता वराच्या जागी श्रीविष्णु आहेत’, असे मानून त्याच्या चरणांवर चंदनाने स्वस्तिक काढतात. हा विधी चालू असतांना वधुपिता; म्हणून श्री. रेणकेकाका माझ्या चरणांवर स्वस्तिक काढत होते. तेव्हा मला कसेतरी वाटत होते. काकांचे वय पहाता त्यांनी माझ्या चरणांना स्पर्श करणे मला योग्य वाटत नव्हते. त्यानंतर प.पू. डॉक्टरांनी माझ्या मनात विचार दिला की, ‘तूसुद्धा श्रीविष्णु देवतेला अनुभवण्याचा प्रयत्न कर.’ त्या वेळी मी भाव ठेवला की, ‘माझ्या जागी श्रीविष्णु आहे आणि मी त्याच्या चरणांवर चंदनाने स्वस्तिक काढत आहे.’ असा भाव ठेवल्यावर मला पुष्कळ आनंद जाणवला आणि श्रीविष्णूचे अस्तित्व जाणवून पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१ इ. विवाहाच्या वेळी नामजप एकाग्रतेने होणे : विवाह मुहूर्ताच्या वेळी मी व्यासपिठावर आल्यावर आरंभी माझ्याकडून ‘परम पूज्य डॉक्टर’, असा नामजप आपोआप होऊ लागला. मंगलाष्टके चालू झाल्यावर माझा श्रीकृष्णाचा नामजप चालू झाला. मनात बराच वेळ कृतज्ञतेचे विचार येत होते. नंतर बराच वेळ मनामध्ये कोणतेही विचार नव्हते. ‘माझे मन शांत आणि स्थिर झाले आहे’, असे मला जाणवले.
१ ई. विवाहाच्या वेळी संतांची उपस्थिती लाभल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : विवाहाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. पृथ्वीराज हजारे, पू. संदीप आळशी, पू. रेखा काणकोणकर आणि बालसंत पू. वामन राजंदेकर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी व्यासपिठावर येऊन आम्हाला भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘सर्वच संतांना नमस्कार करतांना त्यांचे आशीर्वादरूपी चैतन्य ब्रह्मरंध्रातून शरिरात जात आहे आणि अंगावर रोमांच येऊन शरीर कंप पावत आहे’, असे मला जाणवले.
१ उ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधकांना अक्षता वाटणे, त्या अक्षतांमधून चैतन्याचे प्रक्षेपण होणे : संतांनी आशीर्वाद दिल्यावर अन्य साधक व्यासपिठावर येण्यास रांगेत थांबले होते. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी अक्षता वाटणार्या साधिकेकडून अक्षतांचे ताट घेतले आणि त्या स्वतः साधकांना अक्षता वाटू लागल्या. हे पाहून आम्हाला ‘काय करावे ?’, हे कळेना. साधकांनीही त्यांना सांगितले की, ‘‘आम्ही अक्षता वाटतो, आमच्याकडे द्या.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या वधू-वरांवर चैतन्याचे प्रक्षेपण करा.’’ साक्षात् श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या हस्ते वाटलेल्या अक्षता चैतन्याने भारित झाल्या आणि त्या अक्षता साधकांनी आमच्या मस्तकावर वाहिल्याने आम्हाला पुष्कळ चैतन्य मिळाले. अक्षता मस्तकावर पडतांनाही आम्ही तसे अनुभवत होतो. ‘संतांचे प्रेम आणि दृष्टीकोन किती उच्च स्तराचे असतात !’, हे यातून शिकायला मिळाले.
१ ऊ.श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी वधू-वरांना विवाहाविषयी ‘सर्वकाही छान होईल’, असे सांगून आश्वस्त करणे आणि त्यानुसार सर्वकाही निर्विघ्नपणे अन् उत्तमरित्या पार पडणे : विवाह होण्यापूर्वी विवाहाविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी आमचे बोलणे झाले. त्या वेळी त्यांनी ‘सर्वकाही छान होईल’, असे म्हटले होते. त्यांच्या संकल्पानुसार विवाहाच्या दिवशी आणि त्यानंतर घरी गेल्यावरही तेथील सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे आणि उत्तमरित्या पार पडले. ‘संतांनी मुखातून वदलेले प्रत्येक वाक्य हे संकल्पासमानच असते’, असे यातून लक्षात आले.
१ ए. कुटुंबियांनी विवाह सोहळा आश्रमात होण्यासाठी अनुमती देणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे : काही कारणास्तव दोन्ही बाजूचे कुटुंबीय विवाहासाठी आश्रमात येऊ शकणार नव्हते. ‘आमचा विवाह आश्रमातील चैतन्यमय वातावरणात व्हायला हवा’, असे मला तीव्रतेने वाटत होते. याविषयी कुटुंबियांनी स्वतःहूनच ‘आम्ही विवाहस्थळी उपस्थित नसलो, तरी चालेल; पण विवाह आश्रमात झाला, तर तो सात्त्विक, विधीवत आणि आध्यात्मिक स्तरावर होईल’, असे सांगितले. दोन्हींकडील कुटुंबियांनी या निर्णयाला अनुमती दिली. त्यामुळेच विवाह आश्रमात होऊ शकला. आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या क्षणी ‘आमचा विवाह आध्यात्मिक स्तरावर व्हावा, यासाठी कुटुंबियांनी केलेला हा एक प्रकारचा त्यागच आहे’, असे मला वाटले. याबद्दल कुटुंबियांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१ ऐ. साधकांप्रती कृतज्ञता वाटणे आणि विवाह सोहळा भाव अन् चैतन्य यांच्या स्तरावर होणे : विवाह सोहळ्याला कुटुंबीय नव्हते; मात्र आश्रमातील संत आणि साधक यांनी आम्हाला कुटुंबियांची उणीव किंचितही भासू दिली नाही. ‘परात्पर गुरूंनी घडवलेला सनातन परिवार हा खर्या अर्थाने आध्यात्मिक परिवार आहे’, याची मला प्रचीती आली. त्याबद्दल मला सर्व साधकांप्रती कृतज्ञता वाटली.
परात्पर गुरूंचा सदैव असलेला आशीर्वाद आणि विवाहसमयी केवळ आश्रमातील संत अन् साधक यांची उपस्थिती असल्याने विवाह सोहळा हा भावसोहळा झाला. परात्पर गुरूंनी एका साधकाशी बोलतांना यामागील गमक सांगितले की, सोहळ्यात केवळ साधक आणि संत असल्याने सोहळा चैतन्याच्या स्तरावर झाला.
(क्रमशः)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/?p=857054&preview=true