लॉस एंजेलिस (अमेरिका) – अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगलातील आगीशी झुंजणार्या अमेरिकेच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. १४५ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १४ सहस्र कर्मचारी, १ सहस्र ३५४ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ८४ विमाने प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत आगीतील मृतांची संख्या २४ वर पोचली आहे.
१. मँडेव्हिल कॅन्यनमधील आग विझवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. मँडेविन कॅन्यन येथे प्रसिद्ध अभिनेते अर्नोल्ड श्वार्झनेगर यांच्यसह अनेक प्रसिद्ध कलाकारांची घरे आहेत.
२. आगीमुळे केवळ सहस्रावधी घरे जळून खाक झाली असे नाही, तर शैक्षणिक क्षेत्राचीही हानी झाली आहे. सर्वत्र प्रचंड धूर आणि राख पसरल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कॅलिफोर्नियाच्या शिक्षण विभागाने पुष्टी केली आहे की, राज्यातील अनेक शैक्षणिक उपक्रम थांबले आहेत.
३. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी या आगीला अमेरिकन इतिहासातील सर्वांत वाईट आपत्तींपैकी एक म्हटले आहे.