
प.पू. डॉक्टर,
डिसेंबर २००३ मध्ये तुम्ही मला सांगितले होते, ‘‘तू तुझे ३० टक्के प्रयत्न कर. मी तुझ्यासाठी ७० टक्के प्रयत्न करतो.’’ तुम्ही असे म्हटले असले, तरीही या २० वर्षांत मला असे अनुभवायला आले की, तुम्ही माझ्यासाठी ७० टक्के नाही, तर १०० टक्के प्रयत्न केले आहेत. तुमच्या या वाक्याची प्रचीती आणि तुम्ही माझ्यासाठी स्थुलातून घेतलेले परिश्रम यांचे फळ २० वर्षांनी मिळाले. ३.२.२०२४ या दिवशी माझ्या आध्यात्मिक त्रासाचे स्वरूप ‘तीव्र’ मधून ‘मध्यम’ झाल्याचे आश्रमाच्या भोजनकक्षातील फलकावर लिहिण्यात आले. त्यानंतर माझा आध्यात्मिक त्रास न्यून होण्याचा मला पुढीलप्रमाणे घटनाक्रम आठवला.

२३.९.२०२१ या दिवशी तुम्ही मला कळवले, ‘‘तुला पूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास होता. या त्रासातून तू या जन्मात सुटली नसतीस; पण आता सुटलीस आणि नुसती सुटलीस असे नसून पुढे चाललीस ! (तुझी आध्यात्मिक प्रगती होत आहे.)’’ त्यानंतर मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना तुमचे उद्गार सांगितले आणि ‘‘माझ्या तीव्र आध्यात्मिक त्रासाचे स्वरूप ‘मध्यम’ झाले आहे का ?’’, असे विचारले. तेव्हा त्यांनी सूक्ष्मातून परीक्षण करून सांगितले, ‘‘आध्यात्मिक त्रासाचे स्वरूप मध्यम होण्यासाठी आध्यात्मिक त्रासाची तीव्रता ५० टक्क्यांपेक्षा न्यून व्हावी लागते. तुझा आध्यात्मिक त्रास पूर्वीपेक्षा न्यून झाला आहे; पण ५० टक्क्यांपेक्षा न्यून होण्यासाठी अजून १ – २ टक्केच बाकी आहेत. त्यामुळे काही मासांनी पुन्हा परीक्षण करू.’’ त्यानंतर थोड्या थोड्या मासांनी सद्गुरु गाडगीळकाका माझ्या आध्यात्मिक त्रासाचे परीक्षण करत होते; पण माझ्या त्रासाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत येत नव्हती. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आध्यात्मिक त्रासाचा १ – १ टक्का न्यून होण्यासाठीही अनेक मास किंवा अनेक वर्षेही जावी लागतात.’’ त्यामुळे नंतर मी त्यांना विचारणेही बंद केले.
आश्रम व्यवस्थापनातील साधक अधूनमधून ‘तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांचा त्रास न्यून झाला का ?’, याचे संतांना विचारून परीक्षण करत असतात. त्यानुसार ज्या साधकांचा त्रास न्यून होतो, म्हणजे ज्यांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता ५० टक्क्यांपेक्षा न्यून झाल्याचे सांगण्यात येते आणि अशांची नावे आश्रमाच्या भोजनकक्षातील फलकावर लिहिण्यात येतात. गेल्या अडीच वर्षांत एकदाही माझे नाव त्या सूचीत आले नाही. ३०.११.२०२३ या दिवशी अशा प्रकारे एकूण ४ साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याचे सांगण्यात आले; पण माझ्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता ५० टक्क्यांपेक्षा न्यून न झाल्यामुळे त्या सूचीतही माझे नाव नव्हते.
त्यानंतर केवळ २ मासांनी, म्हणजे २७.१.२०२४ या दिवशी तुम्ही मला कळवले, ‘‘पूर्वी तुझा आध्यात्मिक त्रास ७० टक्के होता; पण आता १० टक्केही राहिला नाही.’’ अशा प्रकारे तुम्ही काढलेल्या या उद्गारांमुळे माझ्या आध्यात्मिक त्रासाचे स्वरूप ‘मध्यम’ झाल्याचे आश्रमाच्या भोजनकक्षातील फलकावर लिहिण्यात आले.
यावरून माझ्या लक्षात आले की, अडीच वर्षे झाली, तरीही माझा केवळ २ टक्के त्रासही न्यून होत नव्हता; पण केवळ २ मासांत तुम्ही माझा त्रास ५१ टक्क्यांवरून १० टक्क्यांपेक्षाही न्यून, म्हणजे जवळ जवळ ४० टक्क्यांनी न्यून केला. हे सारे माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहे. तुमची कृपा, तुमचा संकल्प, तुम्ही माझ्यासाठी अनेक वर्षे स्थुलातून घेतलेले परिश्रम आणि २० वर्षांपूर्वी तुम्ही काढलेले उद्गार यांमुळे साधनामय आयुष्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा तुमच्या कृपेमुळे पार करता आला.
प.पू. डॉक्टर, अनेक साधकांनी मला ‘‘त्रास न्यून होण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस ?’’, असे विचारले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझा आध्यात्मिक त्रास न्यून होण्यात माझे क्रियमाण ० असून तुमचे योगदान १०० टक्के आहे. माझ्या आयुष्याच्या कठीण काळात तुम्ही मला आधार दिला नसता, तर मी कधीच हा टप्पा साध्य करू शकले नसते.
‘तुमची माझ्यावर अशीच कृपादृष्टी अखंड राहो’, अशी तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना !
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |