वाढती संघटित गुन्‍हेगारी आणि त्‍यावर मात करण्‍यासाठी करावयाची उपाययोजना !

महाराष्‍ट्राचे माजी पोलीस महासंचालक श्री. प्रविण दीक्षित यांनी नुकताच काही पत्रकारांशी वार्तालाप केला. त्‍यात त्‍यांनी वाढती गुन्‍हेगारी आणि त्‍यावर मात करण्‍यासाठी करावयाची उपाययोजना यांवर चर्चा केली. या वेळी त्‍यांनी व्‍यक्‍त केलेले विचार येथे देत आहोत. १९ नोव्‍हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुंडांच्‍या टोळींचा विस्‍तार मर्यादेच्‍या बाहेर, गुन्‍हेगारीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी समाजाचा सक्रीय सहभाग, गुन्‍हेगारीवरील नियंत्रणासाठी परराष्‍ट्रांचे साहाय्‍य’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/855944.html

बालगुन्‍हेगारी, पोलीस यंत्रणा आणि न्‍यायालय यांविषयीचे रेखाचित्र

५. कारागृहे आणि न्‍याययंत्रणा यांत झालेले पालट अन् काही सूचना

मी महाराष्‍ट्रामध्‍ये याची कार्यवाही केली होती. आम्‍ही २० सहस्र कैद्यांना ‘व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंग’च्‍या माध्‍यमातून ‘टेलीमेडिसीन’ ही सुविधा उपलब्‍ध करण्‍यासाठी मुख्‍य रुग्‍णालय आणि इतर रुग्‍णालये यांच्‍याशी जोडले. त्‍यामुळे गर्दी करून त्‍यांना बाहेर जाण्‍याची आवश्‍यकता भासली नाही. त्‍याचप्रमाणे आम्‍ही या माध्‍यमातून खटले घेतले आहे. उदा. नक्षलवाद्यांच्‍या खटल्‍यामध्‍ये देहली विद्यापिठातील प्रा. साईबाबा यांचा खटला. त्‍यांची महाराष्‍ट्रातील गडचिरोली न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याची आवश्‍यकता होती. ही सुनावणी ‘व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंग’द्वारे घेण्‍यात आली. ते नागपूर येथील कारागृहात होते. केवळ एकच वेळा त्‍यांना प्रत्‍यक्ष नागपूरहून गडचिरोली येथे न्‍यावे लागले. अशा प्रकारे ‘व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंग’च्‍या माध्‍यमातून सर्व सुनावण्‍या आपण घेऊ शकतो. आज प्रत्‍येक न्‍यायाधिशाला भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि नेटवर्क वगैरे सर्व सुविधा देण्‍यात आल्‍या आहेत. अधिवक्‍त्‍यांनाही भ्रमणभाषद्वारे त्‍यांचा व्‍यवहार करता येऊ शकतो. विशेषतः कोविड महामारीच्‍या काळामध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालय, उच्‍च न्‍यायालय आणि जिल्‍हा न्‍यायालये हे ‘इंटरनेट’च्‍या माध्‍यमातून खटले चालवत होते. त्‍यामुळे आपण या ‘टेलिकम्‍युनिकेशन’ (संपर्क दळणवळण यंत्रणा) पद्धत वापरून अधिकाधिक खटले चालवले पाहिजेत. त्‍यातून ज्‍यांच्‍यावर खटले चालू आहेत, अशा कैद्यांनी कारागृहे भरले जाण्‍याच्‍या स्‍थितीमध्‍ये मोठ्या प्रमाणात पालट होऊ शकतो.

यापुढे जाऊन मला वाटते की, काही गुन्‍हेगार ज्‍यांना ३ वर्षांहून अल्‍प शिक्षा झालेली आहे, त्‍यांना दुसरीकडे ठेवण्‍यात यावे. आज अशा प्रकारचे गुन्‍हेगार कारागृहात गेल्‍यानंतर मोठे गुन्‍हे केलेल्‍यांच्‍या संपर्कात येतात आणि अजून गुन्‍हे करण्‍यास प्रवृत्त होतात. अशा प्रकारची स्‍थिती होता कामा नये. त्‍यामुळे अशा गुन्‍हेगारांचे खटले ६ मास किंवा वर्षभरात संपवले पाहिजेत. त्‍यातून लहान गुन्‍हेगारांचे मोठ्या गुन्‍हेगारांच्‍या संपर्कात येण्‍यावर आळा बसेल. सध्‍या या सुधारणा करणे आवश्‍यक आहेत.

६. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या बाबा सिद्दिकी यांच्‍या हत्‍या प्रकरणात अन्‍वेषण यंत्रणांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्न

बाबा सिद्दिकी आणि प्रवीण लोणकर

लॉरेन्‍स बिष्‍णोईसारख्‍या विशिष्‍ट टोळ्‍यांविषयी माध्‍यमांमध्‍ये सतत उल्लेख होत आहे. मुंबईत नुकतीच बाबा सिद्दिकी यांची हत्‍या झाली. त्‍यानंतर काही दिवसांनी प्रवीण लोणकर या व्‍यक्‍तीचे ‘मी बाबा सिद्दिकीच्‍या हत्‍येचे दायित्‍व घेत असून लॉरेन्‍स बिष्‍णोई याच्‍या संपर्कात आहे’, असे वक्‍तव्‍य सामाजिक माध्‍यमांमध्‍ये प्रसिद्ध झाले. ‘लॉरेन्‍स बिष्‍णोई याचा या प्रकरणात सहभाग असल्‍याचा कोणताही पुरावा नाही. त्‍याचा सहभाग नाही’, असे मी म्‍हणणार नाही; पण मला वाटते की, या प्रश्‍नाकडे खुल्‍या दृष्‍टीकोनातून पाहिले पाहिजे. तो मुद्दामहून आपल्‍याला गोंधळात टाकण्‍याचा प्रयत्न करत असेल, मुद्दामहून प्रसिद्धीमाध्‍यमे आणि पोलीस या यंत्रणांना गोंधळात टाकण्‍याचा प्रयत्न करत असेल किंवा हे कृत्‍य लॉरेन्‍स बिष्‍णोई याच्‍या टोळीने केले आहे, हे दाखवण्‍याचा प्रयत्न झालेला असेल. त्‍यामुळे वरकरणी दिलेल्‍या या माहितीवर मी विश्‍वास ठेवणार नाही. यासंबंधी त्‍या व्‍यक्‍तीची चौकशी करून याविषयीच्‍या घटना पडताळल्‍या पाहिजेत. या चौकशीमधून मिळालेल्‍या सबळ पुराव्‍यांच्‍या आधारे या प्रकरणात कोण सहभागी आहे, याविषयी सांगता येऊ शकते.

उदाहरणार्थ लॉरेन्‍स बिष्‍णोई याला तिहार कारागृहातून २ मासांपूर्वीच गुजरात येथील साबरमती कारागृहात नेण्‍यात आले आहे. या कारागृहामध्‍ये भ्रमणभाषवरील संभाषणाला प्रतिबंध करण्‍यासाठी ‘जॅमर्स’ बसवले आहेत. या कारागृहातून कुणालाही बाहेरच्‍या जगाशी संपर्क साधता येत नाही. त्‍यामुळे लॉरेन्‍स बिष्‍णोई याला कारागृहातील ‘अंडा सेल’मधून कुणाशीही संपर्क करता येणार नाही. असे असेल, तर मग इतर काही कारणे पडताळली पाहिजेत. अशी कोण माणसे आहेत की, ज्‍यांनी स्‍वतःच्‍या स्‍वार्थासाठी अशा प्रकारच्‍या प्रसिद्धीला प्रोत्‍साहन दिले आहे ? त्‍यामुळे याविषयी खोलवर जाऊन शांतपणे अन्‍वेषण केले पाहिजे. सध्‍याच्‍या काळात असे करणे आवश्‍यक आहे असे वाटते.

७. कारागृह अधिकारी, अट्टल गुन्‍हेगार आणि कारागृहे यांची स्‍थिती  

श्री. प्रवीण दीक्षित

कारावासात बंद असलेले गुंड तेथील कनिष्‍ठ अधिकार्‍यांना काही बक्षिसे देऊ करतात. त्‍याला ते अधिकारी फसू शकतात. त्‍यामुळे तेथे निश्‍चित भ्रष्‍टाचार चालतो. जर लाच देऊन काम होत नसेल, तर ते अधिकार्‍यांना धमकी देतात. मुंबई कारागृहातील एका गुंडाने कनिष्‍ठ अधिकार्‍याला नाही, तर कारागृहाच्‍या मुख्‍य अधीक्षकालाच धमकी दिली होती, ‘मी कारागृहात बंदूक आणू शकतो आणि तुम्‍हाला कारागृहात ठार केले जाईल, याची खात्री देतो.’ हे गुंड असे काही करू शकतात. ते कारागृहात अमली पदार्थ किंवा शस्‍त्रे यांची तस्‍करी करू शकतात. त्‍यामुळे अमली पदार्थ किंवा शस्‍त्रे यांची कारागृहामध्‍ये तस्‍करी थांबवण्‍यासाठी आपल्‍या कर्मचारीवर्गामध्‍ये ऐक्‍य आणि प्रामाणिकपणा असल्‍याची खात्री केली पाहिजे. याखेरीज अशा गोष्‍टींवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी कारागृहातील ‘सीसीटीव्‍ही’, ‘जॅमर्स’ इत्‍यादी गोेष्‍टी व्‍यवस्‍थित चालतात कि नाही ?, याची खात्री केली पाहिजे. कारागृहातील अट्टल गुन्‍हेगार हे अधिकार्‍यांना भ्रष्‍टाचाराचे आमीष दाखवू शकतात किंवा त्‍यांना मारण्‍याची धमकी देऊ शकतात. अधिकारी याला न बधल्‍यास धमकी देणे वगैरे कोणत्‍याही पातळीला जाऊ शकतात; कारण त्‍यांचे बाहेरच्‍या जगाशी संबंध असतात. त्‍यामुळे त्‍यांचे इतर राज्‍यातील दुर्मिळ परिसरातील कारागृहामध्‍ये स्‍थलांतर करणे, ही यावर उपाययोजना होऊ शकते.

भारतातील बहुतांश कारागृहे ही ब्रिटीश काळातील आहेत. या कारागृहांच्‍या बांधकामाची जवळजवळ १०० वर्षे देखभाल करण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांचे आधुनिकीकरण केले पाहिजे. सर्व कारागृहे आधुनिक सुविधांनी सुसज्‍ज असणे, तेथील सुरक्षा चांगली असणे, कुंपण चांगले करणे, ‘जॅमिंग’ची सुविधा असणे आवश्‍यक आहे. मी काही कारागृहे पाहिली आहेत, जेथे कैदी शेकडोच्‍या संख्‍येने भ्रमणभाष आणू शकतात. यावर विश्‍वास बसत नसला, तरी ही सत्‍य परिस्‍थिती आहे.

८. बाबा सिद्दिकी याच्‍या हत्‍येमागे व्‍यावसायिक शत्रूत्‍वाची पार्श्‍वभूमी 

‘बांधकाम व्‍यावसायिक किंवा इतर लोक जे समाजातील लोकांना वित्तपुरवठा करतात, तेही बाबा सिद्दिकी याच्‍या हत्‍येमागे असू शकतात’, असे अंदाज विविध माध्‍यमांमध्‍ये वर्तवले गेले आहेत. माझ्‍या मते बाबा सिद्दिकी आणि मुंबईतील एक बांधकाम व्‍यावसायिक यांच्‍यामध्‍ये व्‍यवसायातील हे शत्रूत्‍व आहे. यात कोट्यवधी रुपयांचा भूखंड हा वादाचा विषय होता. सदर भूखंड त्‍या बांधकाम व्‍यावसायिकाला देण्‍यात आला होता आणि बाबा सिद्दिकी याला तो भूखंड त्‍याच्‍या हातातून निसटू द्यायचा नव्‍हता. यासमवेतच बाबा सिद्दिकी हा त्‍याची मतपेढी वाढवण्‍यासाठी सीमारेषेवरून येणार्‍या निर्वासितांना त्‍या भागात स्‍थापित करण्‍याचे काम करत होता. त्‍यामुळे मुंबईसारख्‍या भागात ‘लँड (भूमी) माफिया’ या प्रश्‍नावर लक्ष द्यायला पाहिजे. जे कुख्‍यात गुंड अमली पदार्थांचा व्‍यापार, भूमी बळकावणे आणि समाजविघातक कृत्‍ये करणे यांमुळे मोठे झालेले असतात, त्‍यांच्‍या विरोधात सरकारने कारवाई करू नये; म्‍हणून राजकीय पक्षातील माणसांना जवळ करण्‍याचा प्रयत्न करतात. काही प्रमाणात ते पोलिसांकडून संरक्षण मिळवण्‍यातही यशस्‍वी झालेले असतात. त्‍यांच्‍या माध्‍यमातून ते शत्रूला ‘मी शक्‍तीशाली आहे आणि मला पोलिसांचे संरक्षण मिळू शकते’, असा संदेश पाठवतात. दुसरीकडे शत्रूपक्षातील लोकही तेवढेच तुल्‍यबळ असतात. ते इतर यंत्रणा किंवा ‘बाऊन्‍सर्स’ (खासगी सुरक्षारक्षक) यांना हाताशी धरून किंवा सुपारी देऊन हत्‍या करण्‍यात यशस्‍वी होतात. हे सर्व असे घडत असते. मुळात हे समाजविघातक शक्‍तींच्‍या व्‍यवसायामध्‍ये शत्रूत्‍व निर्माण झाल्‍यामुळे होते आणि मग त्‍याला राजकीय हत्‍या झाल्‍याचा रंग दिला जातो.

९. खंडणीसाठी कुख्‍यात गुंडांचे दूरभाष आल्‍यावर काय करावे ?

समाजविघातक लोक सतत श्रीमंत लोकांना धमक्‍या देऊन त्‍यांच्‍याकडून पैसे उकळत असतात. अशा धमक्‍या येतात, तेव्‍हा त्‍यांनी स्‍थानिक पोलीस आणि ज्‍येष्‍ठ पोलीस अधिकारी यांना कळवले पाहिजे. जेव्‍हा त्‍यांना अशा प्रकारचे दूरभाष येतात, तेव्‍हा त्‍यांनी कोणत्‍याही परिस्‍थितीत घाबरून जाऊ नये. त्‍यांनी अशा धमकीला प्रतिसाद दिला आणि ते खंडणी म्‍हणून काही पैसे देऊ लागले, तर त्‍याला अंत नसतो. यात त्‍यांचे जीवन उद़्‍ध्‍वस्‍त होऊ शकते. कोणत्‍याही परिस्‍थितीत त्‍यांनी कोणत्‍याही टोळीला दाद देऊ नये. इस्रायलमध्‍ये खंडणीखोर किंवा आतंकवादी यांच्‍याकडून धमकी आली, तर त्‍याविषयीची माहिती लगेच कायद्याची कार्यवाही करणार्‍या यंत्रणांना दिली जाते. त्‍यानंतर या यंत्रणांनी त्‍याविषयीची कृती करायची असते. या यंत्रणा धमकी देणारी व्‍यक्‍ती देशातील कि विदेशातील आहेत, हे पडताळून पहातात. ते अशा व्‍यक्‍तीवर त्‍वरीत कारवाई चालू करतात आणि त्‍यांना संरक्षण मिळण्‍याची खात्री करतात. त्‍यामुळे श्रीमंत लोकांनी सरकार किंवा कायद्याची कार्यवाही करणार्‍या यंत्रणा यांंवर विश्‍वास ठेवून अशा प्रकारच्‍या कल्‍पनेतील भीतीला फसू नये. त्‍यांनी धैर्य धरून काळजी घेण्‍यासाठी अशा प्रकारची पावले उचलली पाहिजेत. आपण स्‍वतःची काळजी घ्‍यायलाच पाहिजे; परंतु समाजविघातक शक्‍तींना प्रसन्‍न करणे किंवा त्‍यांना प्रोत्‍साहन देणे, असा त्‍याचा अर्थ नाही.      (क्रमशः)

– श्री. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, मुंबई.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/856648.html

संपादकीय भूमिका

कारागृहात भ्रमणभाष, अमली पदार्थ आणि अवैध शस्‍त्रे आढळणे, हे पोलीस प्रशासनाच्‍या भ्रष्‍टाचाराचे हिमटोकच !