पुणे – सनातन हा भारताचा पाया असून सनातनवर प्रहार करणे, हे विनाशाला आमंत्रण आहे. ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नहीं, एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ ‘गावजत्रा मैदाना’त आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘‘देशात काँग्रेसचे सरकार असतांना पाकिस्तान भारतात घुसखोरी करत होता. आतंकवादी कारवाया काँग्रेसने रोखल्या नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या काळात ‘हम छेडेंगे नही, लेकीन हमे छेडेंगे तो छोडेंगे नही’ असा संदेश जगभरात गेला आहे. भारताला जोडणारी शक्ती महायुतीत आहे, तर महाआघाडी ही ‘महाअनाडी’ आहे. विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यास गेल्यानंतर दगडफेक केली जाते. गडावर अतिक्रमण का झाले ? अयोध्या, काशी, मथुरा, वर्ष १९४७ मध्ये लाखों हिंदूंची हत्या का झाली ? श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक, श्रीरामनवमी शोभायात्रेवर दगडफेक का होत होती ? कारण आपण विभागलो होतो. काँग्रेसने देशहिताचा कधीच विचार केला नाही. काँग्रेसला सत्तेची लालसा नसती, तर देशाची फाळणी झाली नसती. निर्दोष लाखो हिंदूंची हत्या झाली नसती. काँग्रेसने फाळणी करून देशाच्या हिताला तिलांजली दिली.