मुंबई – काँग्रेसने ‘फेक नारेटिव्ह’ (खोटे कथानक) सिद्ध करून मतांचे विकेंद्रीकरण केले, मग आपल्या लोकांना एकत्र येण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ आवाहन केले, तर त्यात काय चुकले ? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ नोव्हेंबर या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपस्थित केला. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेद्वारे मतदान वाढवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे’, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
‘माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार उभा केल्यामुळे राज ठाकरे यांच्याशी वितुष्ट निर्माण झाले का ?’ या प्रश्नावर उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यात कोणताही मतभेद किंवा विसंवाद नाही. काही चर्चा वेळेवर व्हायला हव्या होत्या. त्या न झाल्यामुळे असे घडले; मात्र हे केवळ निवडणुकीपुरते आहे. निवडणुकीनंतर वातावरण निवळेल.’’
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी महायुतीची भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी आमच्या सरकारने शिंदे समिती गठीत करून त्यासाठी आवश्यक माहिती गोळा केली. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळवून दिले. मराठा समाजाला न्याय देतांना इतर मागासवर्गीय समाजावर अन्याय होऊ नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. मनात एक आणि कृती वेगळी, अशी आमची भूमिका नाही.’’