महिलांनी दुचाकीवर बसतांना सतर्क रहाण्याचे दर्शवणारी घटना !
झांशी (उत्तरप्रदेश) – महिलांना दुचाकीवर बसतांना किती सावध राहिले पाहिजे, हे दर्शवणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक महिला तिच्या ६ महिन्यांच्या मुलीला घेऊन एका नातेवाइकाच्या दुचाकीवर मागे बसली होती. त्या वेळी त्या महिलेची ओढणी दुचाकीच्या ‘चेन’मध्ये अडकल्याने मोठा अनर्थ घडला. ओढणी हाताला गुंडाळलेली असल्याने तिचा डावा हात चेनमध्ये अडकला आणि कोपरापासून तुटल्याचा भयानक प्रकार घडला. हा अपघात झांशी येथील हंसारी-राजगड मार्गावर झाला. महिलेने तिचा हात गमावला असून एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू आहेत.
राजगड येथील रहिवासी जयराम अहिरवार यांच्या रक्षा नावाच्या मुलीचे गेल्या वर्षीच लग्न झाले आहे. रक्षा तिच्या ६ महिन्यांच्या मुलीसह भाऊबिजेनिमित्त माहेरी आली होती. तेव्हा हा अपघात झाला.